बीड: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के बसत आहे. बीड जिल्ह्यातील केज मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करून देखील नमिता मुंदडा यांनी तडकाफडकी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. लवकरच त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील ५ उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यात नमिता मुंदडा यांचा देखील समावेश होते. मात्र त्यांनी पक्ष सोडला आहे. आज सोमवारी मुंदडा यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एक ओळीचे राजीनामा पत्र पाठवले आहे.
नमिता या राज्याच्या मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. डॉ. मुंदडा यांनी भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या दोनदा भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर तीनदा त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. त्यांच्या निधनानंतर केजमधून नमिता यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या संगीत ठोंबरे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पराभवानंतरही राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा संधी दिली होती.