ग्रामस्थांचे आमरण उपोषण मागे : माजी आमदार राजीव देशमुख यांची शिष्टाई
चाळीसगाव- तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या कामांमध्ये झालेला गैरकारभार आणि भ्रष्टाचार बाबत चौकशी करण्यात यावी यासाठी घोडेगाव ग्रामस्थ पंचायत समिती समोर गेल्या दोन दिवसांपासून उपोषणाला बसले होते. आज अखेर गटविकास अधिकारी यांनी आठ दिवसात चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.
ग्रामस्थ विनोद राठोड, अर्जुन राठोड, वसंत चव्हाण यांनी उपोषण केले होते. उपसभापती संजय पाटील यांनी लिंबू पाणी देऊन उपोषण सोडले तर या प्रक्रियेत माजी आमदार राजीव देशमुख यांची शिष्टाई महत्वाची ठरल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
काय आहे मागणी ?
सन २०१५ ते २०१८ पर्यंत घोडेगाव ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत अनियमितता आणि संबंधित कामांबाबत झालेला गैरकारभार संदर्भात ग्रामस्थांच्यावतीने पंचायत समिती चाळीसगाव आणि जिल्हा परिषद येथे वेळोवेळी तक्रारी देण्यात आल्या होत्यात. याबाबत शासन स्तरावरुन अद्यापपावेतो कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही. ४ डिसेंबर २०१७ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देण्यात आले होते त्यानंतर देखील ९ जानेवारी २०१८ रोजी स्मरणपत्र देण्यात आले होते त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ५ मार्च २०१८ रोजी चाळीसगाव पंचायत समितीस संबंधित कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु चाळीसगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या पत्रास केराची टोपली दाखवली होती.
१४ व्या वित्त आयोगाची सखोल चौकशी होऊन दोषी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच ग्रामपंचायतीत होत असलेल्या मनमानी कारभार आणि गैरव्यवहार बाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात शासनाने कारवाई करावी अशी मागणी विनोद राठोड व ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी माजी सभापती विजय जाधव, विरोधी पक्षाचे गटनेते अजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष भगवान राजपूत, विस्तार अधिकारी बी.एस.बागुल, विस्तार अधिकारी भाऊसाहेब शिर्के, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वप्नील कोतकर, आबा माळी, ओंकार जाधव, बापू पवार गुरुजी, जे.के.पाटील, बी.बी.पवार, सुदाम निकुंभ, सौरभ त्रिभुवन, नामदेव जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.