बीडीओ विषप्राशन प्रकरणी सभापती-उपसभापतींसह आठ जणांविरुद्ध गुन्हा

0

चाळीसगाव । प्रतिनिधी । चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी त्यांच्या दालनातच गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. लोकप्रतिनिधी व अधिकार्यांकडून सातत्याने होणार्‍या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले होते. या प्रकरणी तीन दिवसानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील यांच्यासह आठ जणांविरुद्ध शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

सभापतींसह उपसभापती व सदस्य झाले आरोपी

पंचायत समिती सभापती स्मितल दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती संजय भास्कर पाटील, सभापती पती दिनेश पुरूषोत्तम बोरसे, पंचायत समिती सदस्य कैलास चिंतामण निकम, पंचायत समिती सदस्य सुनील साहेबराव पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी के.व्ही.मालाजंगम, सहा.प्रशासन अधिकारी आर.डी.महिरे, ग्रामसेवक संजय अभिमन्यू निकम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तीन तास जवाब, चार पानांची फिर्याद

शनिवारी सायंकाळी गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी जवाब देण्यास सुरुवात केली. तब्बल चार पानी लेखी जवाब देण्यात आल्यानंतर रात्री ११.३० वाजेच्या सुमारास आठ आरोपींविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भादंवि ५०६, ३४ व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा ३ (१) (एम) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

बेकायदेशीर कृत्यासाठी टाकला दबाव

मधुकर वाघ यांच्या जवाबानुसार लोकप्रतिनिधींकडून होणार्‍या त्रासामुळे त्यांनी जि.प.चे सीईओ यांच्याकडे बदलीसाठी विनंती केली होती व संबंधितानी तसा शेरादेखील दिला होता. मनरेगा अंतर्गत विहिरी १४ सदस्यांना २० हजारांप्रमाणे वाटप करू द्या, असा आग्रह संजीव निकम, दिनेश बोरसे, संजय पाटील यांनी करीत त्रास देणे सुरू केले होते. बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी दबावही टाकण्यात आला. ६२ लाभार्थींची यादी आपण नियमानुसार तयार केली मात्र संबंधितानी केवळ ४२ लाभार्थींचीच यादी काढावी यासाठी दबाव टाकल्याचे फिर्यादीत नमूद आहे.