मुंबई : नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासांतर्गत 14 जुलैपासून, पुन्हा नव्याने बायोमेट्रीक सर्वेक्षणाला सुरूवात होणार आहे. मात्र मागच्याप्रमाणे हे सर्वेक्षण देखील उधळून लावू, असा इशारा अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांच्या एकत्रित संघाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी पुन्हा एकदा दिला आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीसाठी आणि करारनामा करण्यासाठी बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
तांत्रिक चूकांमुळे सर्वेक्षण बंद पाडलेले
याआधी मे महिन्यात म्हाडा आणि उपजिल्हाधिकार्यांकडून बायोमेट्रीक सर्वेक्षणाला सुरूवात झाली. पण बीडीडीतील रहिवाशांनी जोरदार विरोध करत हे सर्वेक्षण पहिल्याच दिवशी उधळून लावले. सर्वेक्षणात बर्याच तांत्रिक चुका असल्याने आणि बीडीडीतील रहिवाशांची संमती न घेता, करारनामा न करताच सर्वेक्षण होत असल्याचे म्हणत एकत्रित संघाने हे सर्वेक्षण बंद पाडले.
नोटीसा पाठवण्यास सुरूवात
बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या म्हणण्याप्रमाणे दुसर्या घराची अट रद्द करण्यासह इतर तांत्रिक अडचणी दूर केल्याने आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार ना.म.जोशी मार्ग आणि नायगावमधील बीडीडी रहिवाशांना 14 जुलैपासून सर्वेक्षणाला सुरूवात करण्यासंबंधीच्या नोटीसा पाठवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बायोमेट्रीकवरुन सुरू असलेला वाद आणखी चिघळतो की बायोमेट्रीक सर्वेक्षण यशस्वीपणे होते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.