बीड-बहिणीने प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या भावाने मित्राच्या मदतीने मेहुण्याची हत्या केल्याची सैराट स्टाईल धक्कादायक घटना बीडमध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा क्षीरसागर या आरोपीला अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने ही अटकेची कारवाई केली आहे. कृष्णा क्षीरसागर याच्यावर मुख्य आरोपी बालाजी लांडगेला सहकार्य केल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ अद्यापही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
बीडच्या तालखेड येथे राहणारा सुमित वाघमारे, भाग्यश्री लांडगे हे दोन्ही आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत होते. दोन महिन्यांपूर्वी सुमित आणि भाग्यश्रीने कोर्टात जाऊन विवाह केला. या विवाहाला भाग्यश्रीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे याला देखील हा विवाह खटकत होता.
बुधवारी सुमित आणि भाग्यश्री हे दोघे परीक्षेसाठी महाविद्यालयात आले होते. परीक्षा संपवून दोघेही महाविद्यालयाच्या गेटजवळ येताच बालाजी लांडगे आणि त्याचा एक साथीदार तिथे पोहोचले. दोघेही एका कारमधून आले. त्यांनी सुमितवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले आणि पळ काढला. डोळ्यादेखत पतीवर हल्ला झाल्याने भाग्यश्रीला सुरुवातीला नेमके काय घडले हेच कळले नाही. रिक्षाचालक आणि स्थानिकांच्या मदतीने तिने पतीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.