बीड – लातूर आणि उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ११ जूनच्या आधी निकालाची प्रक्रिया सुरू करावी, असा न्यायालयाचा आदेश होता. मात्र यावर अजूनही मार्ग निघाला नाही. काकू-नाना आघाडीने पुन्हा खंडपीठात धाव घेतल्यानंतर आता पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली आहे.
शुक्रवारी न्यायलयात सुनावणी
बीड नगरपालिकेतील काकू-नाना आघाडीच्या दहा नगरसेवकांना अपात्र करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना बीड उस्मानाबाद आणि लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नव्हते. मात्र नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेत मतदानावरील बंदी उठविली होती. आता त्याच प्रकरणावरून मोठे वादंग पेटले आहे. दहा अपात्र नगरसेवकांचे मतदान ग्राह्य धरण्यात येवू नये, असे अपील करण्यात आले होते. परंतु मतदानाचा आणि गोपनियतेचा भंग होवू नये यासाठी काकू-नाना आघाडीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पुन्हा अपील करण्यात आले आहे.
उत्सुकता शिंगेला
या अपिलावर सुनावणी होईपर्यंत मतमोजणी न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी आता शुक्रवारी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत तरी निकाल आता लागणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस निकाल पुढे ढकलत चालल्याने लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अशोक जगदाळे तर भाजपकडून सुरेश धस हे उमेदवार आहेत.