बेकायदा वाहनतळचा विषय आमसभेत आला होता चर्चेत, रस्त्याने घेतला मोकळा श्वास
अजित पाटील – उरण । तुम्ही बातम्या छापा नाहीतर टी व्ही वर न्यूज दाखवा आमच्यावर काहीच फरक पडत नसल्याच्या तोर्यात बीपीसीएल मार्गावर बेकायदेशीर वाहनतळ चालविणार्याचे धाबे दणाणलेत की कोण जाणे मात्र या मार्गावर मागील दोन दिवसांपासून ही पार्कीग दिसत नसल्याने या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला आहे. भेडखल गाव ते बीपीसीएल आणि जीटीपीएस ते बीपीसीएल मार्गावरची गॅस टँकरची अनधिकृत पार्कीग गेले काही महिने पोलिसांच्या आशीर्वादाने चालविली जात होती यावर काही सामाजिक संघटनांनी देखील आक्षेप घेतला होता तर उरणच्या आमसभेत देखील हा विषय चागंलाच गाजला होता. या सर्व पार्श्वभूमीवर या संपूर्ण मार्गावर आज केवळ दोन चार गाड्या वगळता फारशी बेकायदा पारकिंग दिसत नव्हती त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसत होते.
स्थानिक पोलीसही करत होते दुर्लक्ष
उरणच्या पूर्व भागातील नागरिकांना बाजारहाट आणि तालुक्याच्या मुख्य ठिकाणी जाण्याचा अतिशय जवळचा मार्ग म्हणून खोपटा पूल मार्गे भेडखल ते बी पी सी एल कंपनी समोरून शेवा मार्गे उरण हा मार्ग आहे. या मार्गावर असलेल्या बी पी सी एल कंपनी समोरचा सिडकोच्या मालकीचा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत पार्कीग चालविर्यानी गीळकृत करून टाकला होता.
भेडखल गाव ते बीपीसीएल आणि जीटीपीएस ते बीपीसीएल मार्गावरची गॅस टँकरची अनधिकृत पार्कीग पोलिसांच्या आशीर्वादाने चालविली जात होती. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना रिक्षा चालक, छोटे वाहनधारक, दुचाकी स्वार, विद्यार्थी वाहक वाहने, कामगार वाहक वाहने यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता, या संदर्भात स्थानिक पोलीस ही या रस्त्यावरच्या पार्कीगकडे बघितले तरी न बघितल्याचे सोंग घेऊन गप्प बसणेच पसंत करीत होते त्यामुळे भर रस्त्यावर अनधिकृत वाहनतळ चालविणार्या वर मात्र देवाचीच कृपा असल्या सारखा कारभार या ठिकाणी सुरू होता.