उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांना फटकारले
मुंबई : लोकांनी बीफ खावे, एकमेकांना किस करावे, पण या सगळ्याचे उत्सव साजरे करण्याची काय गरज आहे, असा सवाल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उपस्थित केला. सोमवारी मुंबईतील पोद्दार महाविद्यालयात नायडू यांनी पुन्हा बीफ बंदीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भाष्य केले. कत्तलीसाठी जनावरांच्या खरेदी-विक्रीवर गेल्यावर्षी केंद्र सरकारने बंदी घातली होती. त्यानंतर विरोधकांकडून भाजपावर मोठ्याप्रमाणावर टीका करण्यात आली होती. अनेक राज्यांतील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी बीफ पार्टीज आयोजित करून या निर्णयाचा निषेध केला होता. यासंदर्भात नायडू यांनी दुसर्यांदा असे वक्तव्य केले आहे.
अफझल गुरुचा उल्लेख
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नायडू म्हणाले, तुम्हाला बीफ खायचे तर खा. त्यासाठी महोत्सव कसले आयोजित करता? त्याचप्रमाणे किस फेस्टिव्हलही कशाला? जर तुम्हाला एखाद्याला किस करायचे असेल तर फेस्टिव्हल अथवा कुणाच्या परवानगीची गरज का भासते? काही लोक अफझल गुरुच्या नावाचा जप करतात. हे काय सुरू आहे? त्याने संसद उडवून देण्याचा प्रयत्न केला होता, हे लक्षात राहू द्या, असे म्हणत नायडूंनी भाजपविरोधकांना फटकारले.
काय खावे ही प्रत्येकाची आवड
गेल्यावर्षी केंद्र सरकारने जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातल्यानंतर विरोधक आणि काही संघटनांनी या निर्णयावर टीका केली होती. त्यावेळी सुद्धा नायडू यांनी विरोधकांचा समाचार घेतला होता. त्यावेळी नायडू यांनी विरोधकांवर बीफ बंदीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. मी स्वतः मांसाहारी असून, कुणी काय खावे, काय खाऊ नये, ही ज्याची-त्याची आवड आहे. काही लोक प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्यासाठी काहीही बोलत सुटले आहेत, असे नायडूंनी म्हटले होते. काही दिवसांपूर्वी तिरूअनंतपूरम येथील कार्यक्रमातही त्यांनी राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत करता कामा नये, असा सल्ला दिला होता.