पिंपरी-चिंचवड : शेतकर्यांची आर्थिक विपन्नावस्था दूर करून त्यांना आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम करता येईल, यासाठी बीव्हीजी गु्रपने (भारत विकास गु्रप) सखोल अभ्यासाअंती कृषी क्षेत्राकरिता नॅनो तंत्रज्ञान शोधून काढले आहे. या नॅनो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील पारंपरिक पीक पद्धतीत कोणते आवश्यक बदल केले पाहिजेत, कोणत्या हवामानात कोणते पीक घ्यावे, उत्पादन वाढीसाठी पिकांना खते व पाणी कसे द्यावे, किती प्रमाणात द्यावे, यासारखी इत्यंभूत माहिती शेतकर्यांना दिली जाणार आहे. ही माहिती शेतकर्यांना वेळच्यावेळी मिळावी, म्हणून बीव्हीजीने एक अॅप विकसित केले आहे. या अॅपशी शेतकरी जोडला गेल्यानंतर त्याला सर्व माहिती मिळेल. त्यामुळे जो शेतकरी आज एका एकरात जेवढे उत्पन्न घेत आहे; भविष्यात तेवढ्याच क्षेत्रात तो आजच्या चौपट उत्पन्न घेईल, अशी माहिती बीव्हीजी गु्रपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हनुमंत गायकवाड यांनी दिली. गायकवाड यांनी शनिवारी दैनिक ‘जनशक्ति’च्या पिंपरी-चिंचवड कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘जनशक्ति’चे व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सहाय्यक संपादक (कार्पोरेट) अविनाश म्हाकवेकर, सरव्यवस्थापक हनुमंत बनकर, जाहिरात व्यवस्थापक अमित शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी कृषी, पशुसंवर्धन, गृहनिर्माण क्षेत्रात बीव्हीजीने केलेले क्रांतिकारी संशोधन, गु्रपची आतापर्यंतची वाटचाल, भविष्यात योजना तसेच वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार याविषयी दिलखुलास चर्चा केली.
पशुसंवर्धन क्षेत्रातही क्रांती होणार
भारतात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. या व्यवसायातही शेतकर्यांना चांगला मोबदला मिळावा, म्हणून भाकड जनावरांवर बीव्हीजीने वैज्ञानिक प्रयोग करून लसी शोधून काढत त्यांना दुभते केले. दूध देणारी गाय किंवा म्हैस 50 ते 60 हजार रुपयांस मिळते. मात्र, दुभती जनावरे भाकड झाली की, ती कवडीमोल किंमतीत शेतकर्याला विकावी लागतात. ही परिस्थिती येऊ नये, म्हणून बीव्हीजीने पशुसंवर्धन क्षेत्रातही संशोधन केले आहे. भाकड जनावरांसाठी अवघ्या 300 ते 400 रुपयांना लस उपलब्ध आहे. ही फार तर दोन किंवा तीन वेळा द्यावी लागते. त्यानंतर भाकड जनावरेही चांगले दूध देऊ लागतात. त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहोचून पशुसंवर्धन क्षेत्रातही बीव्हीजी क्रांती घडवून आणणार असल्याचे हनुमंत गायकवाड म्हणाले.
सर्वसामान्यांना मिळेल हक्काचे घर
स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे स्वप्न असते. हे स्वप्न बीव्हीजी साकार करणार आहे. गृहनिर्माण क्षेत्रातही बीव्हीजी पदार्पण करणार असून, देशातील प्रमुख महानगरांमध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणारी घरे साकारणार आहे. बीव्हीजी आपला पहिला गृहनिर्माण प्रकल्प पुण्यातील हिंजवडी, नर्हे येथे साकारणार असून, तेथे 200, 400, 500 चौरस फुटांची घरे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल, अशा किंमतीत असतील. 8 लाख, 10 लाख, 12 लाख रुपयांमध्ये ही घरे मिळतील. बीव्हीजीचा गृहनिर्माण प्रकल्प इतर प्रकल्पांपेक्षा वेगळा असेल. रि-सायकल मटेरियलचा वापर, भूकंप प्रतिरोधक, तापमान सहन करण्याची क्षमता, वाजवी किंमत, पर्यावरणपूरक अशी त्याची वैशिष्ट्ये असतील, असेही हनुमंत गायकवाड यांनी सांगितले.
घरकाम करणार्या महिलांना सामाजिक सुरक्षा देऊ
घरकाम करणार्या महिलांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नसल्याने त्यांच्या भविष्याची कोणतीही हमी नसते. आजारपण, मुलांचे शिक्षण, कौटुंबीक जबाबदारी अशा बाबींसाठी त्यांना खूप तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय, त्यांच्या कामाचीदेखील ठोस शाश्वती नसते. अशा महिलांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा बीव्हीजीचा मानस आहे. त्यावर बीव्हीजीची टीम काम करत आहे. घरकाम किंवा इतर मेहनतीची कामे करणार्या महिलांसाठी किमान वेतन, पेन्शन याची तरतूद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहरातील किमान 10 हजार महिलांना हा लाभ देण्याचा प्रयत्न आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. बीव्हीजीच्या संकल्पनेनुसार, ‘नो लॉस- नो प्रॉफिट’ तत्त्वावर सारी कामे करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.