कराची । भारताकडून पाकिस्तानसोबत मालिकेसाठी नकार मिळाल्यामुळे त्याबद्दल नुकसानभरपाई वसूल करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान क्रिकेट मंडळ पीसीबी बीसीसीआयला कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. मंडळाचे कायदेशीर सल्लागार सलमान नासीर यांनी कायदेशीर लढाईसाठी नुकताच लंडनचा दौरा केला. नुकसानीचा दावा करण्याच्या दृष्टीने ते गेले होते. बीसीसीआयला कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात यापूर्वीच सांगण्यात आले आहे.
पीसीबी-बीसीसीआय सामंजस्य करारानुसार 2015 ते 2023 या दरम्यान, दोन देशांमध्ये सहा मालिका होणार होत्या. यापैकी तीन मालिकांचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र सध्या तरी पीसीबीचे अंदाजे 20 कोटी डॉलर्सचे नुकसान झाले आहे, असे सांगण्यात येत आहे. यामुळेच पुढील आठवडयात आम्ही ही कार्यवाही करणार आहोत, अशी माहिती पीसीबीच्या पदाधिकार्यांनी दिली. 2014 मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन क्रिकेट मंडळांनी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांतर्गत भारताविरुद्ध दोन मालिका झाल्या असत्या तर पाकिस्तानला उत्पन्न मिळाले असते. मात्र त्या न झाल्यामुळे नुकसानभरपाई द्यावी, अशी पीसीबीची धारणा आहे.
बीसीसीआयला जर त्यांच्या सरकारकडून दौर्यासाठी हिरवा कंदील मिळत नसेल, तर ती आमची समस्या नाही, असे पीसीबीने स्पष्ट केले आहे. आयसीसीवरील वर्चस्व आणि सदस्य राष्ट्रांमध्ये महसूल विभागणी या पद्धतीबाबत भारताला विरोध केला नव्हता. त्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात आमची कायदेशीर मागणी भक्कम आहे, असे पीसीबीने सांगितले आहे.