बीसीसीआयकडून सुनील गावसकरांवर कारवाईची शक्यता

0

मुंबई । भारतीय क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकटची लिटिल मास्टर सुनील गावस्करांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 लढतीच्यावेळी कॉमेंट्री करताना खिल्ली उडवली होती. कॉमेंट्रीदरम्यान जयदेव उनाडकटच्या क्षमतेवर त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. ही खिल्ली गावस्करांना भारी पडू शकते, बीसीसीआय त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात जयदेवला चांगली कामगिरी करता आली नाही. 33 धावा देत त्याने फक्त एकच गडी बाद केला होता. या सामन्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या सुनील गावसकरांनी उनाडकटला टोला मारला.

आयपीएल लिलावात चांगली कमाई केल्यामुळे उनाडकटला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. उनाडकटला जितके पैसे दिले जातात तो त्याच्या लायक आहे का? अशा आशयाचे वक्तव्य गावस्करांनी केले होते. आपली चुक लक्षात येताच गावस्करांनी सारवासारव केली. उनाडकट चांगला गोलंदाज असून फलंदाजांना चकवा देणे त्याला छान जमते, असे ते म्हणाले.

कॉमेंट्रीदरम्यान जयदेवची अशी खिल्ली उडवणार्‍या गावस्करांवर आता बीसीसीआयकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यापूर्वी हर्षा भोगले यांनी 2016 मधील टी-20 विश्‍वचषकादरम्यान विरोधीसंघाचे कौतुक करत भारतीय संघावर टीका केली होती. यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. यावर्षीच्या आयपीएल लिलावामध्ये जयदेव उनाडकट सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला 11.5 कोटींमध्ये राजस्थान संघाने खरेदी केले आहे.