बीसीसीआयचा अडथळा कायम

0

नवी दिल्ली । ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्यास भारतला पदक मिळणे हे निश्‍चित आहे. या खेळाची देशातील पालक संघटना असलेल्या बीसीसीआयची मात्र त्यासाठी तयार नाही. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश व्हावा म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती जोरदार प्रयत्न करत आहे. पण, आयसीसीच्या या प्रयत्नांमध्ये बीसीसीआयची भूमिका मोठा अडथळा ठरली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती ट्वेन्टी 20 क्रिकेटच्या माध्यमातून ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करण्याचे प्रयत्न करत आहे. बीसीसीआयने क्रिकेट हा ऑलिम्पिक खेळ नसल्याचे मत नोंदवत त्यास विरोध दर्शवला आहे. पॅरिसमध्ये 1900 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा 2024 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद पॅरिसला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या ऑलिम्पिकच्या माध्यमातून क्रिकेटला पुन्हा एकदा या जागतिक क्रीडा कुंभमेळ्यामध्ये स्थान मिळवून देण्यासाठी आयसीसी प्रयत्नशिल आहे. ऑलिम्पिक प्रवेशासाठी आयसीसी बीसीसीआयची मनधरणी करत आहे. पण आपल्याशिवाय आयसीसी कुठल्याही मोठ्या स्पर्धेचा विचार करणार नाही हे बीसीसीआयमधील धुरिणींना माहित आहे.

आयओसीची आहे मोठी अट
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी सगळ बडे संघ आणि खेळाडू खेळण्याची हमी आसीसीसीकडे मागितली आहे. त्यामुळे बीसीसीआयला बरोबर न घेता आयसीसीला पुढे पाऊल टाकता येणार नाही. मोठे संघ आणि खेळाडू खेळणार नसतील तर कुठल्याही प्रस्तावाचा विचार करणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने आयसीसीला स्पष्ट केले आहे.

सप्टेंबरची डेडलाइन
पुढील सोपास्कारांसाठी आयसीसीला सप्टेंबर महिन्यापर्यंत आपला निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला कळवायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याकडून ऑलिम्पिकचळवळीत सामिल होण्यासंदर्भात अहवाल मागवला आहे.

बीसीसीआयची स्वायत्तता संपुष्टात येणार
ऑलिम्पिकमधील पुनर्प्रवेशासाठी आयसीसीने योग्य ती सगळी पावले उचलली आहे. आता त्यांना बीसीसीआयचा होकार पाहिजे आहे. मात्र, बीसीसीआयने यासंदर्भात आयसीसीला काहीही कळवलेले नाही. ऑलिम्पिकमध्ये दाखल होण्याची परवानगी दिल्यावर स्वायत्ता संपुष्टात येणार असल्यामुळे बीसीसीआयने त्याला सहमती दिलेली नाही. संघटनेची स्वायत्ता संपुष्टात आणू नये असे काही पदाधिकार्‍यांचे मत आहे. याशिवाय संघटनेच्या उत्पन्नात एक वाटेकरी वाढणार असल्यामुळे बीसीसीआयचा नकार मिळत आहे. ऑलिम्पिकमध्ये दाखल झाल्यास बीसीसीआयला आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा वाटून घ्यावा लागणार आहे. या दोन कारणांमुळे बीसीसीआयने विरोधाची भूमिका घेतली आहे.