बीसीसीआयचा महिला क्रिकेटपटूंशी भेदभाव

0

मुंबई । बीसीसीआयने खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे. बीसीसीआयने खेळाडूंना मिळणारी रक्कम इतर देशांच्या खेळाडूंना मिळणार्‍या रकमेएवढीच आहे पण महिला क्रिकेट संघाला देण्यात येणार्‍या पैशांमध्ये भेदभाव करण्यात आला आहे. पुरुष संघाच्या ए प्लस श्रेणीमध्ये खेळाडूंना 7 कोटी रुपये मिळणार आहेत. तर महिला संघातील अव्वल खेळाडूंना 50 लाख रुपये मिळणार आहेत. पुरुष खेळाडूंच्या चार श्रेणी बनवल्या आहेत. यातली सगळ्यात खालची श्रेणी सी आहे. सी श्रेणीमध्ये असलेल्या पुरुष खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळणार आहेत म्हणजेच पुरुषांच्या सर्वात खालच्या श्रेणीपेक्षाही कमी पैसे महिला संघाच्या सगळ्यात वरच्या श्रेणीला मिळणार आहेत. पुरुष संघामधल्या वर्षाला एकही सामना न खेळणार्‍या जयंत यादव आणि करुण नायर यांना 1 कोटी रुपये मिळणार आहेत.

तर आयसीसी महिला विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवुन इतिहास घडवणार्‍या महिला खेळाडूंना त्यापेक्षा अर्धे म्हणजे 50 लाख रुपये मिळणार आहेत. जयंत यादव या खेळाडूला बीसीसीआयनं सी श्रेणीमध्ये ठेवले आहे म्हणून त्याला वर्षाला 1 कोटी रुपये मिळणार आहेत. जयंत यादव मागील वर्षात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 खेळलेला नाही. करुण नायरने 6 कसोटी सामन्यांमध्ये 62.33 च्या सरासरीने 374 धावा केल्या. यातल्या 303 धावा करुण नायरने या एकाच डावामध्ये केल्या होत्या. सेहवागनंतर कसोटी सामन्यामध्ये त्रिशतक करणारा नायर हा दुसरा भारतीय आहे. करुण नायर शेवटचा कसोटी सामना मार्च 2017 मध्ये खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशालामध्ये झालेल्या कसोटी सामन्यानंतर नायरला सामन्यामध्ये संधी मिळाली नाही. तर करुण नायर भारताकडून 2 एकदिवसीय सामने खेळला. हे दोन्ही सामने झिम्बाब्वेविरुद्ध जून 2016 मध्ये झाले होते.तर महिला संघाच्या ए श्रेणीमध्ये असलेल्या मिताली राज, स्मृती मंधना, हमनप्रीत कौर आणि झुलन गोस्वामीला वर्षाला 50 लाख रुपये मिळतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात झालेल्या कसोटी सामन्यामध्ये जयंत यादव शेवटचा खेळला होता. त्यानंतर भारतीय संघामध्ये त्याला संधी मिळाली नाही. या कालावधीमध्ये हरमनप्रीत कौरने 17 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळले आहेत. मिताली राज आणि स्मृती मंधनानेही जवळपास तेवढेच सामने खेळले आहेत.

ऑक्टोबर 2017 ते सप्टेंबर 2018 या कालावधीसाठी खेळाडूंना ही रक्कम देण्यात येणार आहे. म्हणजेच हे दोन्ही खेळाडू भारताकडून एकही सामना खेळले नाहीत तरीही त्यांच्यासोबत बीसीसीआयने करार केला आहे.