मुंबई : काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ९ महिन्यासाठी ही निवड करण्यात आली होती. मात्र आता २०२४ पर्यंत ते या पदावर कायम राहणार आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षपदाबाबत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. जेव्हा गांगुली यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होता, तेव्हा त्यांचा कार्यकाळ हा ९ महिन्यांचा असेल, असे सांगण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या निर्णयानुसार हा कार्यकाळ ठरवण्यात आला होता. पण हा नियम बदलण्याची मागणी करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयानेही या गोष्टी परवानगी दिल्यामुळे आता सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी २०२४ सालापर्यंत राहू शकतात.
क्रिकेटसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सीएसी आणि विविध समित्यांची घोषणा आमसभेत केली. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गांगुली यांनी सीएसीमधून माघार घेतल्यानंतर कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांच्या समितीने पुरुष संघाचा मुख्य कोच निवडला होता. रंगास्वामी आणि गायकवाड हे खेळाडूंचे प्रतिनिधी या नात्याने ‘बीसीसीआय’मध्ये आले आहेत.
निवड समितीची नियुक्ती हा सीएसीचा विशेषाधिकार आहे. याशिवाय नवा लोकपाल आणि नैतिक अधिकारीदेखील निवडला जाणार आहे. या भूमिकेत असलेले न्या. डी. के. जैन यांचा कार्यकाळ फेब्रुवारीत संपणार आहे.
आमसभेत हितसंबंधांच्या वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा अपेक्षित असून, बीसीसीआयमधील सर्वांत गंभीर मुद्द्यांंपैकी हा एक आहे. अनेक खेळाडूंनी हितसंबंधांच्या मुद्द्यावर तीव्र नापसंती व्यक्त केली असून, सीओएनेदेखील आपल्या अंतिम अहवालात यात बदलाची भूमिका मांडली होती.
दरम्यान, अमोल काळे हे एमसीएचे प्रतिनिधित्व करतील. तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व आरएस रामास्वामी किंवा रूपा गुरुनाथ करू शकतात. रूपा ही श्रीनिवासन यांची कन्या आहे. बंगाल संघटनेचे प्रतिनिधी सचिव अभिषेक दालमिया असतील.