बीसीसीआयवर स्टाफ नाराज!

0

नवी दिल्ली: ‘बीसीसीआय’चे सध्या बुरे दिन सुरु आहेत की काय? असा सवाल निर्माण होत आहे. लोढा समितीच्या शिफारशींच्या वादात अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी केल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफला देखील दणका बसला आहे. संघाच्या सपोर्ट स्टाफला दिलेल्या २५ टक्के मानधन वाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा बॅटिंग कोच संजय बांगर आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांचाही या सपोर्ट स्फाटमध्ये समावेश असून यांनीही बीसीसीआयच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. ‘बीसीसीआय’ने याआधी सपोर्ट स्टाफच्या मानधनात शंभर टक्के वाढ करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र केवळ २५ टक्के वाढीचा प्रस्ताव ‘बीसीसीआय’ने ठेवल्याने सपोर्ट स्टाफने नाराजी व्यक्त केली आहे. मागील वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेवेळी भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील प्रतिनिधींनी बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के आणि अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मानधनात वाढ करण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्देश दिले होते मात्र केवळ २५ टक्केच वाढ निर्धारित झाल्याने स्टाफ नाराज झाला आहे.

मानधनाचा प्रश्न पुन्हा रेंगाळला
तत्कालीन अध्यक्ष अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांनी मानधन वाढीच्या प्रश्नात लक्ष घालून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने जानेवारीत अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांची बीसीसीआयच्या पदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे सपोर्ट स्टाफच्या मानधनाचा प्रश्न पुन्हा एकदा रेंगाळला. बीसीसीआयच्या कारभारासाठी जोपर्यंत नवी समिती नेमण्यात येत नाही तोवर सपोर्ट स्टाफच्या मानधनाचा प्रश्न प्रलंबित राहिला. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी सपोर्ट स्टाफच्या मानधनाचा नवा प्रस्ताव पुढे आणला. पण तो सपोर्ट स्टाफच्या अपेक्षा पूर्ण करणारा नसल्याने तो नाकारण्यात आल्याचे समजते.

प्रशिक्षक व कर्णधारही स्टाफच्या बाजूने
संजय बांगर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील बरेच सदस्य गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ काम करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून सपोर्ट स्टाफच्या मानधनात कोणतीही वाढ झालेली नाही. सेवेत रुजू झाल्याच्या दिवसापासून मिळणारे मानधन तीन वर्षांनंतरही तेवढेच आहे. त्यानंतर नेमणूक करण्यात आलेल्या फिजिओला देखील दोन प्रशिक्षकांइतक्याच मानधनात रुजू करण्यात आले. संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांनीही सपोर्ट स्टाफच्या मानधनात वाढ व्हावी अशी भूमिका मांडली आहे. बीसीसीआयनेही तशी हमी दिली होती, मात्र अद्याप कोणत्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. आता केवळ २५ टक्के वाढीचा प्रस्ताव देऊन जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आले आहे, असे सपोर्ट स्टाफमधील सुत्रांनी सांगितले.

बीसीसीआयला 20 हजार डॉलर्सचा दंड?
पुण्यातील खेळपट्टी खराब असल्याचे सिद्ध झाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला 20 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या दंडाला सामोरे जाण्याचा धोका असेल, असे संकेत मिळाले आहेत. माजी फिरकीपटू शेन वॉर्नने तर पुण्याची खेळपट्टी मंगळाच्या पृष्ठभागासारखी आहे, अशी खरमरीत टीका केली असून यामुळे बीसीसीआयचे आयसीसीला उत्तर काय असेल, याची प्रतीक्षा असणार आहे. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी पुण्यातील खेळपट्टी खराब असल्याचा अहवाल दिला असून याला उत्तर देण्यासाठी आयसीसीने बीसीसीआयला 14 दिवसांची मुदत दिली आहे. पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्यावर बीसीसीआय मुख्य क्युरेटर दलजीत सिंग यांच्याकडून काही सूचना होत्या, असा दावा केला गेला आहे. याप्रकरणी आयसीसी बीसीसीआयला फक्त समज देऊ शकते. किंवा त्यांच्यावर 20 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंडही ठोठावू शकते, असे संकेत आहेत.