बीसीसीआयसमोर श्रीलंकन मंडळ झुकले; मलिंगाला आयपीएल खेळण्याची परवानगी !

0

मुंबई: आयपीएल 2019 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून लसिथ मलिंगाला राष्ट्रीय कर्तव्यावर बोलावणाऱ्या श्रीलंका क्रिकेट मंडळाने बुधवारी बीसीसीआयसमोर नमते धोरण घेतले. बीसीसीआयच्या दबावाला झुकून श्रीलंकन मंडळाने अखेरीस मलिंगाला आयपीएल खेळण्याची परवानगी दिली. श्रीलंकन मंडळाने मलिंगा आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले होते, परंतु बीसीसीआयने टीका केल्यानंतर त्यांनी यू टर्न मारला. त्यामुळे गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मलिंगा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मलिंगाच्या येण्याने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धार तीव्र झाली आहे. जसप्रीत बुमराहही पुर्णपणे तंदुरुस्त झाला आहे.

मागील सीजनला मलिंगा मुंबई इंडियन्सच्या साहाय्यक खेळाडूंच्या चमूत होता, परंतु लिलावात मुंबईने त्याला स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून 2 कोटी रुपयांत संघात दाखल करून घेतले. सध्या तो श्रीलंकेच्या वन डे संघाचे कर्णधारपद भूषवित आहे आणि स्थानिक वन डे स्पर्धेत तो गॅल संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. ही स्पर्धा 4 ते 11 एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यामुळे मलिंगाला आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांना मुकावे लागणार होते.