कोची । स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज शांताकुमार श्रीशांतने मोठा खुलासा केला. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआय सुमारे 13 खेळाडूंना वाचवण्याचा प्रयत्न करत असून, माझ्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचे श्रीशांतने सांगितले. श्रीशांतच्या या दाव्यामुळे आणखी एक नवीन वाद निर्माण झाला आहे. श्रीशांत म्हणाला की, बीसीसीआय या खेळाडूंना पाठिशी घालत आहे, त्यातील पाच ते सहा खेळाडूंना अजुनही आयपीएलमध्ये खेळत आहे. मुदगल समितीच्या अहवालात 13 जणांची नावे होती. त्यामुळे भारतीय क्रिकेटचे होणारे नुकसान डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयने ती नावे जाहिर न करण्याची विनंती केली होती. काही कारण नसताना मी आरोपी झालो, तिहार जेलमध्ये राहिलो. मला या 13 जणांची नावे माहित करुन घ्यायची नाहीत किंवा त्यासंदर्भात काही खुलासा करायचा नाही. दिल्ली सेलमध्ये माझी चौकशी करण्यात आली तेव्हा आणखी काही जणांची नावे घेण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुदगल समितीशी संबंधित असलेल्या वकिलांनीही त्याला दुजोरा दिला होता.
स्पॉट फिक्सिंगमुळे अनेक दु:ख झेलली असल्याचे श्रीशांतने यावेळी सांगितले. श्रीशांत म्हणाला की, स्पॉटफिक्सिंग प्रकरणामुळे माझ्या कुटुंबीयांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. माझ्या परिवाराची, राज्याची त्यामुळे खूप बदनामी झाली. अशी वेळ कोणावर येऊ नये, अशीच मी देवाकडे प्रार्थना करतो. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेल्या श्रीशांत केरळ उच्च न्यायालयाने दिलासा देताना बीसीसीआयला त्याच्यावर घालण्यात आलेली आजीवन बंदी हटवण्यास सांगितले होती. बीसीसीआयने परदेशात खेळण्यासही श्रीशांतवर बंदी घातली आहे.
बीसीसीआयने आरोप फेटाळले
श्रीशांतने केलेले हे आरोप बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्शा विभागाचे अधिकारी नीरजकुमार यांनी फेटाळून लावले आहेत. नीरजकुमार म्हणाले की, नुकतीच केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतच्या क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे तो अशी वक्तव्ये करत आहे. फिक्सींग प्रकरणात कधी काळी अडकलेला एकही खेळाडू सध्यातरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत नाही.