नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीला नवा चेहरा मिळाल्याची चांगली बातमी आली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय सध्या संकटाच्या घेर्यात सापडले आहे. एकीकडे कराराचा भंग केला, असा ठपका ठेवत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) त्यांना कायदेशीर नोटीशीमध्ये बीसीसीआयकडून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे 7 मे रोजी होणार्या त्यांच्या सर्वसाधारण बैठकीत ‘क्रिकेटच्या हिताविरोधात’ निर्णय घेतला तर आम्ही याप्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असा सज्जड इशारा देत प्रशासक समितीचे सर्वेसर्वा विनोद राय यांनी घरचा आहेर दिला आहे. या संकटाच्या मालिकेतून बीसीसीआय काय मार्ग काढते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आयसीसीसोबत चाललेल्या आर्थिक वादामुळे आगामी चॅम्पियन्स करंडकामधील सहभागावर देखील प्रश्नचिन्ह लागून आहे.
बीसीसीआयला प्रशासक समितीचा घरचा आहेर
7 मे रोजी होणार्या त्यांच्या सर्वसाधारण बैठकीत ‘क्रिकेटच्या हिताविरोधात’ निर्णय घेतला तर आम्ही याप्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दिला आहे. इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱया आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याबाबत बीसीसीआय विचाराधीन असल्याचे वृत्त असून त्या पार्श्वभूमीवर राय यांनी प्रशासकीय समितीची भूमिका बुधवारी जाहीर केली. प्रशासक समितीच्या परवानगीशिवाय, बीसीसीआयला कोणत्याही निर्णयाप्रत येता येणार नाही, असे विनोद राय यांनी मंगळवारी नमूद केले होते.
संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण
भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे गुरुवारी अनावरण केले गेले. स्मार्टफोनच्या बाजारातील नावाजलेल्या ओपो कंपनी आता सहाराची जागा घेणार आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. भारतीय क्रिकेट मंडळाचे कार्यकारी संचालक राहुल जोहरी आणि ओपोच्या कार्यकारी संचालकांच्या हस्ते जर्सीचे अनावरण करण्यात आले. भारतीय क्रिकट संघाचा ब्रँड पार्टनर असल्यामुळे नव्या जर्सीवर ओपो असे ठळक अक्षरात लिहिल्याचे दिसते. जर्सीच्या दर्शनी भागासह डाव्या बाहीवर देखील कंपनीचे नाव दिसते. तर जर्सीच्या दर्शनीय बाजूच्या उजव्या बाजूला सर्वात वरच्या भागावर नाईकीचा सिम्बॉल दिसतो. डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो छापण्यात आला असून, बीसीसीआयच्या लोगोवरती तीन स्टार छापल्याचे दिसून येते.
पाकने मागितली नुकसान भरपाई
कराची : 2015 ते 2023 या कालावधीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सहा द्विदेशीय मालिका खेळवण्यात येतील, असा करार दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये झाला होता. पण बीसीसीआयने या कराराचा भंग केला, असा ठपका ठेवत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने त्यांना कायदेशीर नोटीशीमध्ये बीसीसीआयकडून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करून आम्ही बीसीसीआयला नोटीस पाठवली आहे. दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये द्विदेशीय मालिकांबाबत काही करार करण्यात आले होते. बीसीसीआयने या कराराचा भंग केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये द्विदेशीय मालिका होऊ शकली नाही. याप्रकरणी आम्ही बीसीसीआयकडून नुकसानभरपाई मागितली आहे,’ असे पीसीबीमधील एका सूत्राने सांगितले आहे.