मुंबई । बीसीसीआय आणि स्टार इंडिया यांच्यात आगामी पाच वर्षाच्या कालावधीकरता झालेल्या प्रसारण हक्काच्या करारमुळे महाराष्ट्राच्या खजिन्यात कोट्यावधी रुपयांची भर पडली आहे. स्टार इंडियाने नुकतेच आयपीएलच्या टीव्ही प्रसारण आणि डिजीटल अधिकार पाच वर्षांसाठी सुमारे १६,३४७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. या करारापोटी मुद्रांकशुल्क म्हणून महाराष्ट्र सरकाराच्या तिजोरित ८२ कोटी रुपये जमा झाले आहेत.
महाराष्ट्राच्या मुद्रांक शुल्क विभागातील एका अधिकार्याने सांगितले की, स्टार इंडियाच्या प्रिंट आणि टीव्ही मिडीयासंदर्भातील या कराराची माहिती मिळाल्यावर बीसीसीआयकडे हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. नाव न सांगण्याच्या अटिवर हा अधिकारी म्हणाला की, प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या कराराच्या करापोटी मिळणारी रक्कम लवकरात लवकर मिळण्यात खूप मदत झाली. जागतिक प्रसारणा हक्काचा करार महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियमात येत असल्याचे आम्ही बीसीसीआयला सांगितले. बीसीसीआय आणि स्टार इंडिया यांच्यात जो करार झाला त्याच्या नोंदणीसाठी एकुण मुल्याच्या ०.५ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार होते. मागील आठवड्यात स्टार इंडियाने या शुल्कापोटी ८१ कोटी ७३ लाख ७५,५०० रुपये जमा केले.