बी.जे. मार्केटमधील जुगार क्लब चालकासह तिघांनी केला तरुणाचा खून

0

दुचाकी घेऊन गेल्याचा राग आल्याने चौघांकडून बेदम मारहाण ः मारहाणीनंतर रुग्णालयात सोडून चौघे झाले होते पसार ; बी.जे.मार्केटमध्ये जुगाराचा क्लब होता सुरु

जळगाव :- शहरातील बी.जे.मार्केट मधील क्लब चालकाची दुचाकीसह रोकड नेली म्हणुन क्लबचालकासह चौघांनी प्रमोद विलास पाटील वय 23 रा. पळासदरे ता.अमळनेर या तरुणाला मोरदड तांडा येथून चारचाकीत बसवून आणत बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. मारहाणीनंतर अंत्यवस्थ झालेल्या प्रमोदला बुधवारी पहाटे 2.45 वाजता जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करुन चौघे पसार झाले होते. सकाळी आठ वाजता जखमी प्रमोदचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी जिल्हापेठ पोलिसांना खबर दिल्यानंतर या घटनेची बोंब फुटली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जुगार क्लब चालक अरुण गोसावी ऊ र्फ टिन्या, सुरज उर्फ सुर्‍या विजय ओतारी (वय 26) (दोेघे रा.तुकारामवाडी) व पंकज नारायण सपकाळे (वय 27, रा.गेंदालाल मिल), व गणेश उर्फ मेंबर सोमा नन्नवरे (वय 40, रा.पाळधी, .धरणगाव) या चौघांना अटक केली आहे. दरम्यान जिल्हाप्रशासनाकडून अवैधधंदे बंद असल्याचा दावा करण्यात येत असला तरी या घटनेमुळे तो फोल ठरला आहे. जुगार अड्डाच तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याही नागरिकांमध्ये चर्चा आहे. याप्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. चौकशीनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लबच्या धंद्यातील रोकड, दुचाकी पळविल्याचा संताप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण गोसावी याचा बी.जे.मार्केट परिसरात पत्त्यांचा क्लब आहे. या क्लबवर पंकज, सुरज, गणेश नन्नवरे हे काम करतात. काही महिन्यांपासून प्रमोद हा देखील क्लबवर येत होता. तो तेथे काही कामे देखील करीत असे. सात दिवसांपूर्वी प्रमोद हा अरुण गोसावी याची दुचाकी (एमएच 19 सीएम 2221) घेऊन गावाकडे निघुन गेला होता. मोटारसायकल चोरी झाल्याने ऑनलाईन तक्रार दिली. नंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, ही मोटारसायकल क्लबरवरच काम करणार्‍या प्रमोद विलास पाटील (वय-30,रा. अमळनेर) व धमेंद्र राऊत अशा दोघांनी चोरुन नेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. क्लबच्या धंद्यातील रोकड आणि नंतर मोटारसायकलही चोरुन नेल्याने टिन्याचे पित्त खवळले होते. म्हणुन टिन्या गोसावी प्रमोदच्या शोधात होता.

चौघांनी चारचाकीतून आणत केली बेदम मारहाण
मोटारसायकल घेवून गेलेला प्रमोद धुळ्यात असल्याची माहिती अरुण गोसावी ऊर्फ टिन्याला मिळाल्याने त्याने त्याचे साथीदार पंकज नारायण सपकाळे (रा. गेंदालालमील), सुरज विजय ओतारी(तुकारामवाडी), गणेश भास्कर नन्नवरे (पाळधी)अशा तिघांना सोबत घेत मोरदडतांडे(शिरुड चौफुली जि.धुळे) गाठले. येथे चौघांनी मंगळवार(ता.1) रोजी प्रमोदला सोबत चारचाकी कारमध्ये नेत धुळे जिल्ह्याच्या हदीत नेत बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करुन प्रमोदला मोटारसायकलच्या गुन्ह्यात पोलिसांना सोपवुन टाकू असा बेत चौघांनी आखला होता. त्यासाठीच ते पोलिसांच्या संपर्कातही होते. मात्र मारहाणीत प्रमोद गंभीर जखमी झाल्याने त्यास चौघांनी जळगावी पहाटे सव्वातीन वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करुन पळ काढला. प्रमोद पाटिल या जखमीवर डॉक्टरांनी उपचारास सुरवात केली. उपचार सुरु असतांना सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. तत्पुर्वीच सिव्हील चौकीत हजर पोलिस नाईक दिलीप सोनार यांनी जखमी तरुणाचा जबाब नोंदवला, त्याने नाव प्रमोद असल्या बाबत माहिती दिली. त्यावरुन त्याच्या कुटूंबीयांचा शोध सुरु झाला.

अशी झाली गुन्ह्याची उकल
मोटारसायकल चोरीला गेली तेव्हा पासून अरुण गोसावी ऊर्फ टिन्या पोलिसांच्या संपर्कात होता. प्रमोद विलास पाटील याला मारहाण करुन त्याच्याकडून दुचाकी व चोरुन नेलेले पैसे मिळाले की, त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करु असा प्लॅन टिन्याने आखला होता. मात्र मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रमोदचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. प्रमोदचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस यंत्रणेपर्यंत माहिती पोहोचली. त्याच्या शरिरावर मारणीचे व्रण असल्यामुळे हा प्रकार संशयास्पद असल्याचे पोलिसांना कळुन चुकले होते.

पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला सुरूवात झाली. प्रमोद याला रुग्णालयात दाखल करतेवेळी चौघे मारेकर्‍यांना काही रुग्णवाहिका चालकांनी पाहिले होते. ते त्यांना ओळखत देखील होते. त्यानुसार काही जणांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस उप अधिक्षक डॉ.निलाभ रोहन, पोलिस निरीक्षक बापू रोहोम, जिल्हापेठ पोलिस ठाण्याने निरीक्षक अकबर पटेल, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमारे, स्वप्नील नाईक, अशोक महाजन, विजयसिंग पाटील, सुरज पाटील, विजय शामराव पाटील, नरेंद्र वारुळे, विजय पाटील, सुधाकर अंभोरे, भगवान पाटील, दीपक शिंदे व दत्तत्रय बडगुजर यांनी वेगवेगळे दोन पथक तयार केले. एक पथकाने पंकज सपकाळे, सुरज ओतारी , गणेश नन्नवरे या तिघांना ताब्यात घेतले यातील गुन्ह्याचा मास्टरमाईंड म्होरक्या क्लबचालक अरुण ऊर्फ टिन्या गोसावी याच्या मागावर जिल्हापेठ पोलिस होते, गुन्हे शोध पथकातील नाना तायडे, प्रशांत जाधव, तुषार जावरे, अजित पाटील अशांनी गुप्त माहितीच्या आधारे त्यालाही ताब्यात घेतले.

…आई, वडीलांना थेट प्रमोदच्या मृत्यूचीच बातमी मिळाली
दरम्यान, अरुण याची दुचाकी घेऊन गेल्यानंतर त्यांनी प्रमोद हा दुचाकी चोरुन गेला असल्याची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल केली होती. यात प्रमोद व दुचाकीचे फोटो देखील होते. एलसीबीसह पोलिस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांकडे सात दिवसांपासून ही पोस्ट होती. याच पोस्टच्या अधारे बुधवारी रुग्णालयात गेलेले एलसीबीचे कर्मचारी विजयसिंग पाटील यांनी प्रमोदचा मृतदेह ओळखला होता. त्यानुसार पळासदरे येथील पोलीस पाटील संजय पाटील यांच्यासह त्याच्या कुटुंबियांना प्रकार कळविण्यात आला. माहितीनुसार प्रमोदचे काका कैलास विनायक पाटील, पोलिस पाटील, संजय बाबुराव पाटील हे दुपारी दोन वाजता रुग्णालयात आले होते. त्यांनी देखील मृतदेहाची ओळख पटवली. प्रमोद पाटील याच्या पश्‍चात आई कल्पनाबाई, वडील विलास विनायक पाटील, विवाहित बहिण प्रतिभा असा परिवार आहे. वडील शेती करुन उदरनिर्वाह भागवितात. एकुलता एक प्रमोद हा कामानिमित्ताने नेहमी घराबाहेर असतो. त्याप्रमाणे कामासाठी तो बाहेर पडला असावा, म्हणून कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला नाही. बुधवारी थेट त्याच्या मृत्यूची बातमी मिळाली.

अवैधधंदे बंदचा पोलीस विभागाचा दावा फोल
जिल्ह्यात सर्वत्र पोलीस विभागाकडून अवैधधंदे बंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच सुरु असल्यास त्यास कारणीभूत अधिकारी, कर्मचार्‍यांना कारवाईची तंबी देण्यात आली आहे. जर पोलिस विभागाच्या माहितीनुसार अवैधधंदे बंद आहेत, तर जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बी.जे.मार्केटमध्ये जुगाराचा क्लब कसा सुरु होता? जर जुगाराचा क्लब बंद असता तर कदाचित प्रमोदला त्याठिकाणी कामाला नसता व आज त्याचा मृत्यू झाला नसता. जुगार अड्डाच प्रमोदच्या मृत्यूला कारणीभूत असल्याची चर्चा असून ज्या पोलीस कर्मचारी, अधिकार्‍यांच्या आशिर्वादाने हा जुगार अड्डा होता, त्या पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई होईल, काय? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.