घोरपडी । बी. टी. कवडे रोड ते भीमनगर या डीपी रोडसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने गुरुवारी हिंसक वळण घेतले. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान टोळक्यांनी पीएमपीच्या बसेसवर दगडफेक केली. यामध्ये पाच बसेसचे नुकसान झाले. तर, काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
डीपी रोडसाठी प्रशासन व आंदोलक यांच्यामधील चर्चा निष्फळ झाल्यामुळे आंदोलकांमध्ये तणाव निर्माण होते. त्याच दरम्यान काही माथेफिरूंनी बी.टी. कवडे रोडवरील हडपसरकडे जाणार्या पीएमपीच्या तीन बसेसवर दगडफेक केली. तर हडपसर-पुणे स्टेशन दोन बसेसवर दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. येथे बाजारपेठ असल्याने दगडफेक होईल, या भीतीने सर्वांनी आपली दुकाने बंद केली.बसेस फोडल्याची बातमी परिसरात पसरताच नागरिक गर्दी करू लागले. त्यामुळे पोलिसांनी दंगलगस्त पथकाला बोलविले. तसेच मुंढवा आणि वानवडी येथील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी परिसरात पोहचले. पोलिसांनी गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये पोलीस आणि आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे आंदोलक आणखी तीव्र झाले आणि एक तास चर्चा केल्यावर पोलिसांनी आंदोलकांना शांत केले.
यादरम्यान आंदोलक प्रशांत मस्के यांची प्रकृती खालावल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तपासणी केल्यावर म्हस्के यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु हा लढा सुरूच ठेवणार, असे म्हणत आंदोलक महिला ठाण मांडून बसल्या. रात्री दहा वाजता नगरसेविका लता धायरकर आणि नगरसेविका उमेश गायकवाड यांनी आंदोलकांची भेट घेत, हा रस्ता मोकळा करू, असे आश्वासन दिले.डीपी रस्ता खुला होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, या भूमिकेवर प्रशांत म्हस्के अशी भूमिका घेतल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. दुपारी चार वाजता प्रकृती बिघडली तेव्हा पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. परंतु रुग्णालयात जाण्यास विरोध करत आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सायंकाळी त्यांची प्रकृती आणखी ढासळली. यादरम्यान पोलिसांनी जबरदस्तीने म्हस्के यांना घेऊन जाऊ नये, म्हणून महिला आणि कार्यकर्त्यांनी घेराव घातला.