नंदुरबार । महाराष्ट्र शासनाने रेशन दुकान असलेल्या गावातील शेतकर्यांना, शेतीसाठी आवश्यक असलेली प्रमाणित बी – बियाणे स्थानिक ठिकाणींच उपलब्ध व्हावे, यांसाठी कृषी विभागांचा परवाना प्राप्त रेशन दुकानांमधून सिड सर्टिफाईड एजन्सी द्वारे प्रमाणित बी – बियाणे विक्रीसाठी ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शेतकर्यांना गावातच बी – बियाणे उपलब्ध होणार आहेत. याचा फायदा शेतकर्यांना होणारच आहे, परंतु त्यामुळे रेशन दुकानदारांचे उत्पन्न देखील वाढणार आहे.
खुल्या बाजारातील विक्री करण्यास परवानगी
राज्यातील रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यांसाठी दुकानातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत होणार्या विविध वस्तूंसह गव्हाच्या विशिष्ट जाती, तांदुळाच्या विशिष्ट जाती, खाद्यतेल / पाम तेल, कडधान्ये, डाळी, गुळ, शेंगदाणे, रवा, मैंदा, चनापीठ व भाजीपाला इत्यादी खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती.तो प्रयोग फार यशस्वी ठरला आहे. त्यामुळे शासनाने रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढावे तसेच रेशन दुकान असलेल्या गावातील शेतकर्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली प्रमाणित बी – बियाणे स्थानिक ठिकाणींच उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागांचा परवाना प्राप्त रेशन दुकानांमधून सिड सर्टिफाईड एजन्सी द्वारे प्रमाणित बी – बियाणे विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शेतकर्यांना गावात बी – बियाणे, त्यांना योग्य वेळीस उपलब्ध होणार आहेत आणि त्यामुळे शेतकर्यांची वेळेची व पैशांची बचत होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील शेतकर्यांची फसवणूक व अडवणूक टळणार आहे. त्यामुळे या योजनेचा रेशन दुकानदारांनी व शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.