बुंद से गई वो हौद से नहीं आयेगी

0

विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी युती नाही असे सांगून शिवसेना नेत्यांनी आपलेच हसे करून घेतले आहे. त्यांच्या वक्तव्यावर इतर पक्षांचा तर सोडाच पण खुद्द शिवसैनिकांचाच विश्‍वास नाही. युती नाही हे पटवण्यासाठी जे कारण दिले तेही संयुक्तिक नाही. काय तर म्हणे आश्‍वासक मते मिळतील तेथेच सेनेने उमेदवार उभा केला आहे. तसे असेल तर उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा इत्यादी ठिकाणी उमेदवार का उभे केले होते? तेथे आश्‍वासक मते तर नव्हतीच, पण अनामत रक्कमही जप्त झाली तसेच कर्नाटकात 50 जागा लढवणार आहे. तेथे तरी आश्‍वासक मते आहेत का? तसे पाहिले तर सेनेकडे आता काही ध्येयधोरणे राहिलेले नाही. अगोदर ’मराठी’ ’मराठी’ करून महाराष्ट्रीयन जनतेला भुलवले. नंतर हिंदुत्वाचा आव आणला आणि आता तर चक्क एक कलमी कार्यक्रम आहे – सत्ता मिळवणे. पण सत्ता मिळवण्यासाठी चातुर्य, चाणक्य नीती आवश्यक असते. त्याचा सेनेकडे प्रचंड अभाव आहे.

वास्तविक 2014 ला झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीही झाला असता. जागावाटपात भाजपला योग्य वाटा दिला असता, तर दोन्ही पक्षांच्या मिळून दोनशेपेक्षा जास्त जागा आल्या असत्या. भाजपने आपले संख्याबळ गाठले, पण शिवसेनेला ते जमले नाही. कारण शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचूच शकलेली नाही. ग्रामीण भागात शिवसेनेला जनाधार नाही. अशा परिस्थितीत भाजपला लाथाडून शिवसेनेने स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली. मोदींच्या त्सुनामीत युती झाली असती, तर जास्त जागा मिळवून मुख्यमंत्रीपदाची संधी हातची गमावल्याने शिवसैनिक नाराज आहेत. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेच स्वबळाची भाषा करतात. बाकीचे सगळे मंत्री युती करायची म्हणतात. शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा राणा भीमदेवी थाटात निर्णय घेतला, तर निम्मे लोक सेना सोडून जातील, ही भीती वाटल्यानेच शिवसेनेने आता भाजपपुढे लोटांगण घातले आणि युती केली.

भाजपचे शिवसेनेशिवाय काहीही अडणार नाही हे भाजपने 2014ला दाखवून दिले आहे. पण शिवसेनेला मात्र भाजपशिवाय पुढे जाता येणार नाही इतकी ती लंगडी झालेली आहे. त्यामुळे लंगड्या घोड्याने शर्यत जिंकण्यासाठी वाघाचे उसने अवसान आणून डरकाळ्या फोडणे योग्य नाही. याची जाणीव झाल्यामुळेच शिवसेनेने स्वबळाचे हत्यार म्यान केले व भाजपसमोर सपशेल शरणागती पत्करली. सत्तेत राहून भाजपला ऊठसूठ विरोध केल्यानंतर आता 180 अंश घुमजाव करत भाजपशी युती केल्याने सेनेची गेलेली लाज परत येणार नाही. तेव्हा शिवसेना पक्षप्रमुखांना सांगावेसे वाटते, ‘जो बुंद से गई वो हौद से नहीं आयेगी.’

अरविंद तापकिरे
चारकोप, कांदिवली (प) मुंबई.
9819794499