बुद्ध लेण्यांचे जतन केले पाहिजे

0

सिद्धार्थ कसबे यांचे प्रतिपादन : तुळजा बुद्धलेणी येथे सामूहिक बुद्धवंदना

नारायणगाव : बुद्धसंस्कृती ही कोणत्या एका समाजासाठी किंवा धर्मासाठी नव्हती तर अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी होती. आपण या बुद्धलेण्यांचा वारसा विसरत चाललो आहोत. हा वारसा टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. बुद्धलेण्यांचा उपयोग ध्यानधारणा, धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केला जात होता. बौद्ध भिक्षुक हे एक उत्कृष्ट जलसंवर्धक, भूशास्त्रज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक होते. महाराष्ट्रातील सर्व बुद्धलेण्यांचे जतन केले तरच पुढील पिढीला हा बुध्द वारसा मिळणार आहे, असे प्रतिपादन जुन्नर तालुक्यातील बुद्धलेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने जुन्नर तालुक्यातील तुळजा बुद्धलेणी समूहात सामूहिक बुद्धवंदना आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सिद्धार्थ कसबे हे जुन्नर तालुक्यातील बुद्ध लेण्यांविषयी बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश वाव्हळ यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. यावेळी अध्यक्ष दिनेश वाव्हळ, नितीन भद्रिगे पाटील, जगदीश कडलाक, प्रा. सुधीर रोकडे, प्रा. लोंढे, अमर सोनवणे, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. उमेश वाघांबरे, विलास कडलक, शेखर डबडे, भरत कसबे, संदीप घायतडके, गोपी खंडे आदी उपस्थित होते.

कर्मसिद्धांत मानवाला उपयोगी

जुन्नर हे त्यावेळेचे नालंदा, तक्षशिलासारखे मोठे विश्‍वविद्यालय होते. जगभरातून विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येत असत. अनेक परदेशी व्यापार्‍यांनी येथे दान दिल्याचे शिलालेख आहेत. ग्रीक लोकांची जुन्नर ही मोठी वसाहत होती. सातवाहनांची राजधानी जुन्नर होती. कल्याणकारी आणि मंगलमय मानवी जीवनासाठी तथागत बुद्धांनी धम्मामध्ये सुमारे 2600 वर्षांपूर्वी थेरवाद, साम्यवाद आणि कर्मसिद्धांत सांगितला आहे. आजही इतक्या वर्षांनंतर बुद्धांचा कर्मसिद्धांत मानवाला उपयोगी आहे म्हणून बुद्धांच्या विचारांपासून दूर होऊन चालणार नाही, असे कसबे यांनी पुढे बोलताना सांगितले. यावेळी सर्व तरुणांनी बुद्धलेण्या स्वच्छ केल्या. यावेळी प्रा. रोकडे आणि प्रा. लोंढे यांनी आपले विचार व्यक्त केले.