शिक्षेवर जोधपूर न्यायालयात सुनावणी
जोधपूरपासून दिल्लीपर्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त
जोधपूर : लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूच्या शिक्षेवर आज बुधवारी जोधपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीवेळी आसाराम भक्तांना उपस्थित न राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रामरहिम खटल्याच्यावेळी हिंसा भडकली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवला आहे. दिल्लीसहित राजस्थानमध्ये कोणतीही हिंसक घटना घडू नये म्हणून दोन्ही राज्यांनी सुरक्षा बंदोबस्तात वाढ केली आहे. जोधपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. गर्दी दिसताच कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. गुप्तचर विभागाने आसारामच्या सर्व आश्रमांमधील हालचालींवर लक्ष्य केंद्रीत केले आहे.
भक्त जमा होऊ लागले
दरम्यान, बलात्कार प्रकरणात आसाराम बापूची उद्या निर्दोष मुक्तता झाली तरी त्याला तुरुंगातच रहावे लागणार आहे. आसाराम विरोधात गुजरातमध्ये बलात्काराचा खटला सुरू असल्याने तुर्तास तरी त्याची तुरुंगातून सुटका होणार नाही. आसारामची निर्दोष मुक्तता व्हावी म्हणून त्याच्या भक्तांनी भजन-किर्तन सुरू केले आहे. दिल्ली-एनसीआरमधील आसारामच्या आश्रमात मंगळवारपासूनच भक्त मोठ्याप्रमाणावर जमा होऊ लागले होते. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी आश्रमात ठाण मांडले आहे. न्यायालयात बापूला न्याय मिळेल म्हणूनच आम्ही आश्रमात प्रार्थना करत असल्याचे भक्तांनी सांगितले.
पीडितेच्या घराबाहेर बंदोबस्त
आसाराम दोषी ठरल्यास त्याला कमीत कमी दहा वर्षाची शिक्षा होणार आहे. त्यामुळे त्याच्या भक्ताचा संतापाचा भडका उडू शकतो. त्यामुळे आसारामवर बलात्काराचा आरोप करणार्या उत्तर प्रदेशातील पीडितेच्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पीडितेच्या घरी पाच पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलीस अधिकारी पीडितेच्या संपर्कात आहेत. दरम्यान, आसारामने तुरुंगातून भक्तांच्या नावे चिठ्ठी लिहून त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. 25 एप्रिलला भक्तांनी जोधपूरला येऊ नये. त्यांनी त्यांचा पैसा बर्बाद करू नये. तुम्ही जिथे आहात, तिथूनच माझ्या सुटकेसाठी प्रार्थना करा आणि कायद्याचे पालन करा, असे या चिठ्ठीत आसारामने लिहिले आहे.