जळगाव : बहुजन समाजावरील होणार्या अन्यायाविरोधात तसेच बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चेतर्फे बुधवार 11 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता मोर्चांचे आयोजन केले आहे. या मोर्चांमध्ये जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने अनुसूचीत जाती, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी, मुस्लिम अल्पसंख्यांक आदी समुहांना संघटीत करून जिल्हाधिकारी कार्यालयांवर बहुजन क्रांती मोर्चा नेण्यात येणार असल्याचे मुकूंदा सपकाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
आयोजकांतर्फे प्रतिमोर्चा नसल्याचा निर्वाळा
बहुजन क्रांती मोर्चा कोणत्याही जीतीच्या, धर्मांच्या विरोधात नसून हा मोर्चा प्रतिमोर्चा नसल्याचे आयोजकांनी कळविले आहे. यासोबतच हा मोर्चा मराठा समाजाविरोधात नसल्याचे प्रसिद्धपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. मोर्चा सामाजिक सिद्धांतसाठी असून परिवर्तन तसेच न्यायासाठी आहे. सामाजिक क्रांतीची ही लढाई आहे. क्रांती एक जात संघटीत होऊन होत नाही तर समाजातील शोषीतसमाज एकत्र आणून लढाई केल्याशिवाय क्रांती होत नसल्याने परिवर्तनासाठी मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात परिवर्तनासाठी अनुकूल वातावरण आहे. परिवर्तनाची गरज असल्याने बहुजन समाजाने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन क्रांती मोर्चांच्या आयोजकांनी केले आहे.