बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा

0

शहादा (भरत शर्मा)। अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे शेवायांचा आहार दिला जात आहे. मात्र या आहारात बुरशीयुक्त शेवायांचा पुरवठा होत असल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची शक्यता आहे. याबाबत पं.स. सदस्य ओंकार पाटील यांनी सभापती दरबारसिंग पवार यांच्याकडे तक्रार करून बुरशीयुक्त शेवाया सभापतींना दाखविल्या. सभापती पवार यांनी सीडीपीओ ईश्‍वर गोय यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने विभागात खळबळ उडाली आहे. याबद्दल अंगणवाडीतील बालकांच्या पालकांमध्ये देखील खदखद होती. परंतु शासनाविरुद्ध बोलण्यासाठी कोण बोलेल? यामुळे पालकांनी देखील मौन बाळगले होते.

मोहिदे येथील अंगणवाडीला अचानक भेट
याबाबत पंचायत समितीचे सदस्य ओंकार पाटील यांनी मामाचे मोहीदे येथील अंगणवाडीला अचानक भेट दिली असता,शेवायांच्या पुरक आहारात बुरशीयुक्त शेवाया आढळून आल्याने ओंकार पाटील यांनी पंचायत समितीचे सभापती दरबारसिंग पवार व उपसभापती सीमा पाटी यांचेकडे तक्रार करून बुरशीयुक्त शेवयांचा नमुना दिला व याबाबत तक्रार दिली. सभापती पवार यांनी सीडीपीओ ईश्वर गोयर यांच्याकडे कारणे दाखवाची नोटीस देऊन खुलासा करण्याचे आदेश दिले आहे.

अंगणवाडीत सुमारे 15 हजार 336 विद्यार्थी
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यात म्हसावद व सारंगखेडा या दोन विभागात 454 अंगणवाड्या असून सुमारे 15 हजार 336 विद्यार्थी अंगणवाड्यांमध्ये प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांना शासनातर्फे पोषण आहारासाठी खिचडी, दाळ-भात, अंडी, सुकडी, वटाणे आणि शेवायांचा आहार दिला जात असतो. शेवायांचा आहार हा एका बालकाला एका दिवसाला 130 ग्रॅम प्रमाणे देण्यात येतो.

शेवयांची एक विद्यार्थ्याला दोन पाकीटे
260 ग्रॅमचे पाकीट हे एक विद्यार्थ्याला दोन पाकीटे असा आहार महिन्यासाठी आहे. सदर शेवायांचा आहार हा धुळे येथील महाराष्ट्र महिला सहकारी गृह उद्योग केंद्र बाळापूर यांच्यामार्फत शहादा तालुक्यात पुरविण्यात येत आहे. या पुरक आहारात बुरशीयुक्त शेवाया आढळून येत असल्यातरी अंगणवाडीच्या सेवीका यांनी या गंभीर बाबीकडे डोळेझाक केल्याचे चित्र आहे. यामुळे बालकांच्या प्रकृतीवर परिणाम होऊन ते आजारी पडतात, अशी देखील तक्रार आहे.

पंचायत समिती सभापती दरबारसिंग पवार यांची तक्रार व नोटीस मिळाली असून पुरवठा योग्य नाही माणी रद्द करून नवीन पुरवठा करण्यात येणार आहे.
– ईश्वर गोयर, सहा. गट विस्तार अधिकारी, शहादा