नवी दिल्ली : शनिवारी काश्मिरातील त्राल येथे झालेल्या या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर आणि बुरहान वाणीचा साथीदार सबजार अहमद ऊर्फ अबू झरार याला भारतीय जवानांनी ठार केले. सबजार मारला जाणे हा दहशतवाद्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच रामपूर सेक्टरमधील घुसखोरीचा डावही जवानांनी उधळून लावला. भारतीय जवानांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तानच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणार्या ’हिजबुल मुजाहिदीन’ या टोळीला चांगलाच दणका बसला. सबजार अहमद हा बुरहान वाणी याचा अत्यंत जवळचा साथीदार होता. तो बुरहानसोबतच राहत होता. या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओही प्रसिद्ध झाले होते. बुरहान मारला गेल्यानंतर हिजबुलच्या कारवायांची सूत्रे सबजारने हाती घेतली होती. भटबरोबरच त्याचा आणखी एक साथीदार ठार झाला आहे.
घुसखोरी करणारे चार दहशतवादीही ठार
जम्मू-काश्मीरच्या रामपूर सेक्टरमधून घुसखोरी करणार्या 4 दहशतवाद्यांनाही भारतीय जवानांनी कंठस्नान घातले. सीमेवर सैन्याकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली, तेव्हा शनिवार सकाळी लष्कराच्या जवानांना रामपूर सेक्टरजवळ काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर तत्काळ सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. काही दहशतवादी सीमेजवळील तारा कापून आत घुसले होते. त्यांच्यावर तत्काळ गोळीबार करून लष्कराच्या जवानांनी घुसखोरी करणार्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. शुक्रवारी रात्री पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न केला होता. याची खबर लागताच भारतीय जवानांनी प्रतिहल्ला चढवला. त्यात चार दहशतवादी मारले गेले होते. मात्र, त्यानंतरही लष्कराने दहशतवाद्यांचा शोध सुरूच ठेवला होता. हा शोध सुरू असतानाच शनिवारी सकाळी पुन्हा एकदा दहशतवादी व लष्कराच्या जवानांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यात आणखी दोघे मारले गेले. या दोघांच्या खात्म्यामुळे काल रात्रीपासून लष्कराने टिपलेल्या दहशतवाद्यांची संख्या आठ झाली आहे. भारतीय लष्कराचे हे मोठे यश मानले जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक, इंटरनेटवर बंदी
जम्मू-काश्मीरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी व बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी सबजार अहमद ठार झाल्यानंतर ठिकठिकाणी दगडफेक सुरू झाली असून, सरकारने इंटरनेटवर बंदी घातली होती. जम्मू-काश्मीरमध्ये फेसबुक, व्हॉटसऍप आणि ट्विटरसह अन्य काही सोशल नेटवर्किंग साईटसवर असलेली बंदी शनिवारी सकाळी हटविण्यात आली होती. परंतु, सबजार अहमद ठार झाल्यानंतर ठिकठिकाणी दगडफेकीला सुरूवात झाली. यामुळे सरकारने काही तासांतच इंटरनेटवर बंदी घातली. सरकारने इंटरनेट बंद करण्यामागचे कारण व किती काळासाठी असणार याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही. विविध भागांमध्ये दगडफेक होऊ लागली होती. फेसबुक, व्हॉट्सऍपवरून चिथावणी होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.