बुराई नदीच्या काठावर 53 बंधाऱ्यांसाठी 20 कोटी 61 लाखाचा निधी मंजूर

0

दोंडाईचा : शिंदखेडा मतदारसंघाच्या ह्रदयातून जाणा-या बुराई नदीला बारमाही करून नदीच्या काठावर असतांना 4 महिने पाण्यात आणि 8 महिने तहानलेले अशा बुराई नदी काठावरील गावांचा पाणीटंचाई आणि सिंचनाचा प्रश्न कामयचा निकाली काढण्याचा मार्ग पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या जोरदार पाठपुराव्यमुळे अखेर मोकळा झाला असून बुराई नदीला बारमाही करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून बुराई नदीमध्ये एकुण 53 ठिकाणी साठवण बंधारे बांधण्यासाठी 20 कोटी 61 लाखाचा निधी देखील राज्य शासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे.

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे स्वप्न पुर्ण होणार आहे. बुराई नदीच्या काठावरील 40 ते 50 गावांना नववर्षाची हि भेट दिल्याची प्रतिक्रिया पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. शिंदखेडा मतदारसंघाच्या दृष्टीने बुराई नदी ही साक्री तालुक्यातील 19 गांवांमध्ये दुसाणे, बळसाणे, परीसरासह शिंदखेडा तालुक्याच्या मध्यभाग असलेल्या शेवाडे, चिमठाणे, शिंदखेडा, वरसुस येथून वाहत जावून थेट तापीला मिळते, नदीला दरवर्षी पावसाळयात पाणी येते पंरतू पाणी अडविण्यासाठी बंधारे नसल्यामुळे हे पाणी तापीव्दारे समुद्राला मिळत होते, म्हणून मंत्री जयकुमार रावल यांनी गेल्या अनेक वर्षापासून बुराई नदीला बारमाही करण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता, आघाडी शासनाच्या काळात मानव विकास मिशनमधून या कामाला मंजूरी दयावी अशी मागणी केली होती.

आघाडी शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिलेली नव्हती म्हणून राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्री रावल यांनी ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाला याबाबतचा परीपुर्ण प्रस्ताव सादर केला, यांवर अनेकदा बैठका घेतल्या, अखेर ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या बुराई नदीला बारमाही करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून या प्रस्तावातंर्गत बुराई नदीवर दुसाणे, बळसाणे, म्हसाळे, उभंड, सतमाने, जखाणे, अमराळे, दरखेडा, चिमठाणे, शेवाळे, रेवाडी, कढरे, सुलवाडे, फोफरे, घाणेगांव, नागपूर, अशा विविध ठिकाणी 53 साठवण बंधा-यांची नव्याने कामे करण्यात येणार आहेत, हा प्रस्ताव तयार करतांना शिंदखेडा मतदारसंघात बुराई नदीत पुर्णत: पाणी साठेल अशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर शिंदखेडा तालुक्याचा दुष्काळाची झळ कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

मागील काळातील साठवण बंधा-यांच्या कामांचा अनुभव पाहता मंत्री रावल यांनी बंधा-यांची कामे दर्जेदार स्वरूपाची व्हावीत तसेच त्यांचा पुढच्या 50 वर्ष जनतेला लाभ व्हावा म्हणून सदरची सर्व कामे ही जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या कामांना प्रशासकिय मंजूरीचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कामांची गुणवत्ता राखण्यास मोठी मदत होणार आहे.एकुणच पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या अजेंडयावरील सर्वात मोठया प्रस्तावाला राज्य शासनाची मंजूरी मिळाल्यामुळे त्यांनीही मोठा आनंद व्यक्त केला असून ही बुराई नदीच्या काठावरील तहानलेल्या शेतक-यांसाठी नववर्षाची भेट असल्याची प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.