बुराई नदीत 200 क्यूसेस तर डाव्या कालव्यातून 90 क्यूसेस पाण्याचा विसर्ग

0

माजी मंत्री आ.रावल यांच्या हस्ते वाडी शेवाडीतून आवर्तन सुटले

शिंदखेडा: तालुक्यातील जलवाहिनी बुराई नदीवरील वाडी शेवाडी प्रकल्पाचे पाणी बुराई नदीच्या काठावरील गावांना सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची होती. धुळ्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केल्यानंतर माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्या हस्ते मुख्य प्रकल्पाच्या गेटचे बटन दाबून तर डाव्या कालव्याचे चाक फिरवून पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे बुराई प्रकल्पापासून ते थेट तापी नदीपर्यंत असलेल्या शेवाळे, अमराळे, आरावे, चिमठाणे, दराने, रोहाणे, दलवाडे, पिंप्री, दरखेडा, बाभुळदे, अलाने, चिरणे , कदाने, निशाणे, महालपूर, परसामळ, शिंदखेडा शहर, पाटण, वरसुस, देगाव, अशा विविध गावांना लाभ होणार आहे.

यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, कामराज निकम, जि.प. सदस्य विरेंद्रसिंग गिरासे, पं.स. सदस्य रणजित गिरासे, दीपक मोरे, देगावचे दगा गिरासे, शेवाळे सरपंच बबलू कोळी, डी.एस. गिरासे, आरावेचे सरपंच कैलास गिरासे, अमराळेचे सरपंच दीपक बोरसे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
वाडी शेवाडी प्रकल्पाच्या मुख्य गेटमधून बटन दाबून 200 क्यूसेस पाण्याचा विसर्ग आ.रावल यांच्या हस्ते सोडण्यात आले तर डाव्या कालव्यातून 90 क्यूसेस पाणी देगाव आणि शेवाळे गावाच्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सोडण्यात आले. मुख्य गेटद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यातून बुराई नदीमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याद्वारे नदीतील सर्वच बंधारे भरण्यात येणार असून जून महिन्यात या पाण्याचा मोठा लाभ होणार आहे.