बुराई नदीवरील केटी वेअरच्या जलसाठ्याचे जलपूजन

0

शिंदखेडा । येथील बुराई नदीवरील केटी वेअरमध्ये साठलेल्या पाण्याचे पूजन नुकतेच नगरपंचायतीच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या दोन दिवसात हा बंधारा पूर्ण भरणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे शिंदखेडा शहराची पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. सद्य स्थितीत १० ते १२ दिवसात होणारा पाणीपुरवठा ४ ते ५ दिवसात होईल असा अंदाज आहे. शिंदखेडा शहर आणि परिसरात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

परिणामी अद्यापही परिसरातील नद्या नाले कोरडेच आहेत. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना कोरड्याच असलेल्या नदी नाल्यामूळे पाणी टंचाईची तिव्रता भेसूर होण्याची भीती निर्माण झाली होती. आता आजपर्यंत १० ते १२ फूट पाणी या बंधार्‍यात साठले आहे. येत्या दोन दिवसात हा बंधारा पूर्ण भरण्याचा अंदाज आहे. नगराध्यक्ष मथुराबाई मराठे उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, दीपक देसले, किरण चौधरी, दिनेश सुर्यवंशी, युवराज माळी आदी उपस्थित होते.