धुळे । साक्री व शिंदखेडा तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही प्रवाहित करण्यात येणार आहे. त्यासाठी 20.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून बुराई नदीवर 34 बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी 24 बंधार्याचे भूमीपूजन येत्या चार दिवसात करून प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. बंधार्यांचे काम तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. ना. रावल यांनी बुधवार, 11 पासून बुराई नदी पायी परिक्रमेस सुरुवात केली आहे. या परिक्रमेचा शुभारंभ दुसाणे (ता. साक्री) गावापासून झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिंदखेडाच्या नगराध्यक्षा रजनी वानखेडे, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जि.प. सदस्य कामराज निकम, शिंदखेडा पंचायत समितीच्या सदस्या संजिवनी शिसोदे, पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, जि.प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, नितीन गावंडे, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने, तहसीलदार संदीप भोसले, सुदाम महाजन आदी उपस्थित होते. तत्पूर्वी ना. रावल यांच्या हस्ते बुराई नदीवर बांधण्यात येणार्या दोन बंधार्यांचे भूमीपूजन करण्यात आले.
6 हजार एकर क्षेत्र येणार सिंचनाखाली
पुढे बोलतांना ना. रावल म्हणाले की, अवर्षण प्रवण भागाच्या विकासासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुराई नदी बारमाही प्रवाहित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बुराई नदी बारमाही प्रवाहित व्हावी हे स्वप्न आपण पाहिले होते. ते आता साकारत आहेत. बुराई नदी परिक्रमेत एकूण 24 बंधार्यांचे भूमीपूजन होवून त्यांच्या कामास तत्काळ सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी काळात बुराई नदी परिसरातील विहिरींची भूजल पातळी उंचावण्यास मदत होईल. तसेच परिसरातील सुमारे सहा हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
प्रकल्पाची देणार माहिती
माथा ते पायथा दरम्यान, बुराई नदीवर हे बंधारे बांधण्यात येतील. त्यामुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व आगामी काळात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. याशिवाय जलपुनर्भरण होण्यास मदत होईल. बुराई नदी परिक्रमेच्या माध्यमातून परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधता येणार आहे. तसेच बंधारे कुठे बांधणार, त्यांचा कोणत्या गावांना लाभ होणार याचीही माहिती होणार आहे. त्यामुळे पाच दिवसीय बुराई परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात विविध गावांना भेटी देणार आहे. पाच दिवसांत 50 किलोमीटर अंतर पार करावयाचे आहे, असे सांगून बुराई नदीवरील बंधार्यांचे काम गुणवत्ता व दर्जेदार होईल यासाठी संबंधित विभागांनी दक्ष असावे, असे निर्देशही ना. रावल यांनी यावेळी दिले.
जल, जंगल, जमिनीचे संवर्धन होणे आवश्यक
दोंडाईचा बाजार समितीचे सभापती श्री. पाटील यांनी, शिंदखेडा तालुक्यात ना. रावल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे सुरू आहेत. बुराई नदी बारमाही झाल्यावर परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, असे सांगितले तर बुराई नदी परिसराचा सर्वांगीण विकासासाठी जल, जंगल, जमिनीचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. या परिसरात वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे, असे बारीपाडा (ता. साक्री) येथील चैत्राम पवार यांनी सांगितले. यावेळी बबन चौधरी, श्रीमती शिसोदे, संजय बच्छाव आदींनी मनोगत व्यक्त केले.
बुराई परिक्रमेत आज
ना. रावल हे बुराई नदी पायी परिक्रमेत गुरुवार, 12 रोजी सकाळी 7.30 वाजता रेवाडी येथून देवी (ता. शिंदखेडा)कडे प्रयाण करतील. सकाळी 8.30 वाजता देवी येथे आगमन व शेतकर्यांच्या भेटी, सकाळी 9.30 वाजता देवी येथून वाडी-शेवाडी प्रकल्प मार्गे शेवाडकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता शेवाळे येथे आगमन, सभा व राखीव, सायंकाळी 5 वाजता शेवाळे येथे बुराई नदीवरील साठवण बंधार्याच्या भूमीपूजन स्थळाकडे प्रयाण, सायंकाळी 5.30 वाजता बेहेड-जखाणेकडे प्रयाण, सायंकाळी 6.30 वाजता बेहेड (ता.जि. धुळे) येथे आगमन, पान नदीवरील केटीवेअर बंधार्याचे भूमीपूजन, सायंकाळी 7 वाजता बेहेड येथून जखाणेकडे प्रयाण, सायंकाळी 7.30 वाजता जखाणे येथून पान नदीला गावठाण हद्दीत संरक्षण भिंतीच्या बांधकाम व जखाणे येथे पान नदीवरील केटीवेअर बंधार्याचे भूमीपूजन, सायंकाळी 7.45 वाजता जखाणे येथे आगमन व सभा, सांस्कृतिक कार्यक्रम.