लखनौ-उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमधील हिंसाचारात पोलीस निरिक्षक सुबोध कुमार यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपी प्रशांत नट याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर काल रात्री उशीरा सुबोध कुमार यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातलेल्या कलुआ नामक व्यक्तीलाही अटक केली आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीस कलुआकडे चौकशी करीत होते.
३ डिसेंबर रोजी स्याना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंगरावठी भागात झालेल्या हिंसाचारात पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्यासह स्थानिक तरुण सुमीत याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुबोधकुमारला गोळी मारणाऱ्या प्रशांत नटसह २९ जणांना आजवर अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या प्रशांत नटने पोलीस निरिक्षकाला आपणच गोळी घातल्याची कबूली दिली होती. मात्र, पोलिसांच्या चौकशीत हे स्पष्ट झाले की, सुबोधकुमार यांना गोळी घालण्यापूर्वी त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले होते.