पुणे । 90 लाखांची मुदत ठेव व त्यावरील व्याजात अपहार केल्याप्रकरणी प्रभात रोडवरील बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या माजी अध्यक्षांसह संपूर्ण संचालक मंडळावर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपहार 15 सप्टेंबर 2008 ते 22 सप्टेंबर 2017 या नऊ वर्षाच्या कालावधीत घडला.
याप्रकरणी अनिल किसनलाल मर्दा (वय 55, रा. मॉडेल कॉलनी शिवाजीनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संस्थापक अध्यक्ष राधेश्याम देवकिशन चांडक, कोमल झंवर, राजेश देशलहरा, सुकेश झंवर, कांतीलाल छाजेड, रमेशचंद्र राठी, किशोर केला, अंबेश बियाणी, अजय सेंगर, नंदकिशोर झंवर, नंदकिशोर बाहेती, किशोर महाजन विनोद केडीया, विनोद भंडारी, सुबोध काकाणी, गोपाल चिरानिया, मजू नागदेवते, श्रूती गांधी, सरव्यवस्थापक राजेश लढ्ढा, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, शाखाधिकारी, कर्जवितरण व वसुली अधिकारी व इतर संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मर्दा यांनी बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत 90 लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली. या ठेवीवर तारण ठेवून 50 लाखांचे व 15 लाखांचे कर्ज घेतले. त्या कर्जाची पूर्ण परतफेड केली असताना देखील पतसंस्थेने अनिल यांची मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत न देऊन फसवणूक केली.