बुलढाण्यात चोरी, इराणी जाळ्यात

0

भुसावळ। धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्यात कुविख्यात असलेल्या भुसावळच्या सादिकअली इबादतअली (25) व त्याचा साथीदार मोहमद अली लियाकत अली इराणी (28) यांच्या मुसक्या बुलढाणा पोलिसांना बाजारपेठ पोलिसांच्या धाडस व सतर्कतेमुळे आवळण्यात गुरुवारी रात्री उशीरा यश आले. दोघा आरोपींनी गेल्या काही दिवसात चार चोर्‍या करून महिलावर्गात दहशत निर्माण करत पोलिसांच्या गस्तीला आव्हान दिले होते. अट्टल सादिकवर राज्यासह परराज्यात तब्बल 18 वर गुन्हे दाखल असून चार गुन्ह्यांमध्ये त्यास शिक्षाही लागली आहे.

‘वर्णनावरून लागला आरोपीचा छडा
गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा शहरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन-साखळी तसेच मंगळसूत्र लांबवत होते. एका तक्रारदाराने आरोपीचे वर्णन सांगितल्यानंतर बुलढाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर व त्यांचे चार सहकारी भुसावळात आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी ठाण मांडून होते. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार आनंदसिंग पाटील व विकास सातदिवे यांच्यावर यासाठी खास जबाबदारी सोपवण्यात आली होती. गुरुवारी रात्री आरोपी इराणी मोहल्ल्यात आल्याची माहिती दोघा कर्मचार्‍यांना मिळाल्यानंतर आरोपींच्या शिताफीने मुसक्या आवळण्यात आल्या.

कुविख्यात सादिकअलीवर 18 वर गुन्हे
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांना बोलण्यात गुंग ठेवत त्यांच्या गळ्यातील चैन वा मंगळसूत्र अलगद लांबवण्यात माहित असलेल्या सादिकअली इराणीवर भुसावळसह जळगाव, पाचोरा, मलकापूर, बोदवड, बर्‍हाणपूर, खंडवा आदी ठिकाणी 18 वर गुन्हे दाखल आहेत तर चार गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्यास शिक्षा सुनावली आहे तर तो सध्या तो जामिनावर असल्याने पुन्हा धूम स्टाईल चोर्‍या सुरू झाल्या होत्या.

यांचा कारवाईत सहभाग
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे, जयंत पगारे, बोदडे, अनिल पाटील, बुलढाणा पोलिसांसह आरसीपी प्लाटूनच्या पथकाने आरोपींच्या गुरुवारी रात्री मुसक्या आवळल्या.

सततच्या कारवाईमुळे अट्टल चोरट्यांनी बदलला ठिकाणा
जिल्ह्यासह मध्यप्रदेशात कुठल्याही ठिकाणी काही घरफोड्या किंवा सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यास त्याचे धागेदोरे हे भुसावळातील इराणी वस्तीत येऊन मिळतात. त्यामुळे या वस्तीत काही चोरट्यांवर सातत्याने कारवाई होत असल्याने त्यांनी या वस्तीतून आपले बिर्‍हाड शहरातील अन्य भागात हलवले आहे त्यामुळे पोलिसांना यापुढे आणखीन सतर्क रहावे लागणार आहे. रात्री-बेरात्री होणार्‍या पोलिसांच्या कारवाईमुळे अन्य इराणी समाजाकडेही संशयाने पाहिले जात आहे. पोलिसांनी याबाबतही दखल घ्यावी, अशी इराणी समाजबांधवांची मागणी आहे.