14 व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे उद्घाटन
पुणे : महाराष्ट्रच नव्हेतर संपूर्ण भारत बुवांच्या गायकीने मंत्रमुग्ध झाला होता. त्यांच्या गायकीला दैवी आशीर्वाद लाभले होते. बुवा अर्थात जितेंद्र अभिषेकी यांनी श्रोत्यांवर अधिराज्य गाजवले. अशा अधिपतीला महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही अशा भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केल्या. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मरणार्थ उज्ज्वल केसकर, आपला परिसर आणि तारांगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित 14 व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
स्मृती पुरस्कार व युवा पुरस्कार प्रदान
यावेळी दूरदर्शनवर शास्त्रीय संगीतावर आधारित अनेक उत्कृष्ट कार्यक्रमांची निर्मिती करणारे अरुण काकतकर यांना यंदाचा पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार तर डॉ. रेवती कामत यांना युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी, उज्जवल केसकर, दिग्विजय जोशी, महेश पानसे आणि हेमंत पेंडसे उपस्थित होते.
बहादार मैफल सजली
युवा पुरस्कार प्राप्त डॉ. रेवती कामत यांनी प्रातिनिधीक स्वरुपात पुरस्कार्थी या नात्याने मनोगत व्यक्त केले. उद्घाटन समारंभानंतर गायक अनिरुद्ध जोशी, सावनी रविंद्र प्रियंका बर्वे, ऋषीकेश रानडे या गायक कलाकारांनी विविध गीते सादर करून बहादार मैफल सजवली. अमित कुंटे (तबला), अनय गाडगीळ व अमृदा दिवेकर (किबौर्ड), ऋतेष ओहोळ (गितार) यांनी साथसंगत केली. मिलिंद कुळकर्णी यांनी निवेदन केले तर श्रुती निगुडकर यांनी प्रास्तविक केले.