उरण । बहुचर्चित अशा चौथ्या बंदराचे, भारत मुंबई कंटेनर टर्मिनलचे काम आज सोमवार (दि29)पासून सूरू झाले असून निर्यात होणार्या पहिला कंटेनरचे सिमाशुल्क विभागाचे मुख्य आयुक्त विवेक जोहरी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक माईक फार्मासो, बीएमसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश अमिरापू, हेड ऑपरेशन व्यवस्थापक कॅप्टन धवन आदी मान्यवर उपस्थित होते.
जेएनपीटीने सुमारे आठ हजार कोटी रूपये खर्चाच्या नव्या बंदराची उभारणी केली आहे. सर्वाधिक लांबीचा आणि सुमारे 48 लाख कंटेनर हताळण्याची क्षमता असलेले हे बंदर आहे. येत्या 2 फेब्रुवारी पासून या बंदराचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. सीएमए सीजीएम कंपनीचे सेण्टारस हे पहिले जहाज या बंदरात उतरणार आहे. या जहाजातून पहिल्यांदाच या बंदरातील मालाचे कंटेनर निर्यात केले जाणार आहेत. सूरूवातीला आठड्यातून एक जहाज या बंदरात येणार आहे. या निर्यातक्षम कंटेनरचे पहिले-वहिले कंटेनर सोमवारी बीएमसीटीच्या गेटवर दाखल झाले होते. या बंदरात कंटेनरसाठी 8 इन गेट आणि 8आऊट गेट बनविण्यात आले आहेत. पेपरलेस व्यवहार, वजनकाटा आणि रेडिएशन डिटेक्टरसह, डीपीडी आदी अनेक अत्याधुनिक सोयी या बंदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या या बंदरात 165 कर्मचारी असून 80 टक्के कामगार हे स्थानिक आणि महाराष्ट्रातील असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
हजारो रोजगारच्या संधी
जेएनपीटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या या चौथ्या बंदरामुळ हजारो रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या आठवड्यात या बंदरात पहिली व्हेसल येणार आहे. या जहाजातून निर्यात होणार्या कंटेनरचे सिमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत स्वागत करताना आम्हाला आनंद होत असल्याची भावना बीएमसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश अमिरापू यांनी व्यक्त केली. व्यापाराच्या दृष्टीने हे बंदर अतिशय उपयोगी ठरणार असल्याचे मत देखिल त्यांनी व्यक्त केले.