इस्लामाबाद । पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिदीने यापूर्वीच 2010 मध्ये कसोटी क्रिकेटमधून आणि 2015 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने आपली 21 वर्षांची क्रिकेट कारकिर्दी थांबविण्याचा निर्णय घेतला. आफ्रिदीने या महिन्याच्या सुरवातीलाच निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते. जगभरातील लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचे आफ्रिदीने म्हटले होते. आफ्रिदीने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाला अनेक महत्त्वपूर्ण विजय प्राप्त करून दिले आहेत.
वनडे-कसोटीला आधीच राम-राम
पाकिस्तानच्या या स्टार खेळाडूने अगोदरच एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटला अलविदा केलेले आहे. मात्र गेल्या वर्षी भारतात पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये अफ्रिदीने पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले होते. 1996 मध्ये श्रीलंकेविरोधात खेळताना फक्त 37 चेंडूंवर शतक ठोकत शाहिद अफ्रिदीने क्रिकेट चाहत्यांच्या आपली दखल घेण्यास भाग पाडलं होतं. त्यानंतरच ख-या अर्थाने शाहिदीने चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. हा त्याचा दुसराच सामना होता. अफ्रिदीच्या या रेकॉर्डला तब्बल 17 वर्ष कोणीच तोडू शकले नाही.
काही मुद्द्यावर वाद
आफ्रिदीने 1996 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. एकदिवसीय खेळात अफ्रिदीने एकूण 398 सामने खेळला, ज्यामध्ये त्याने 8064 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात 124 ही अफ्रिदीची सर्वोच्च धावसंख्या ठरली. तर त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर 395 विकेट्सदेखील घेतले. शाहिद क्रिकेटच्या मैदानाबाहेर वादग्रस्त विधानांमुळेही चर्चेत राहिला. काही दिवसांपूर्वी शाहिदने काश्मीरमुद्द्यावर आपले मत व्यक्त करून ट्विटरकरांचा रोष ओढावून घेतला होता. भारत-पाकमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादामुळे काश्मिरी जनतेला सहन करावा लागणारा त्रास दुर्देवी असल्याचे मत शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले होते.
एक चांगला अष्टपैलू
आफ्रिदीने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनण्याचा देखील मान मिळविला. आपल्या करिअरमधील उत्तरार्धात अफ्रिदी बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून ओळखू जाऊ लागला. टी-20 क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर पाकिस्तानी संघाची संपुर्ण जबाबदारी अफ्रिदीवरच होती. खासकरुन 2009 मध्ये पाकिस्तानला मिळालेल्या विजयात शाहिद अफ्रिदीचा मोलाचा वाटा होता. अफ्रिदीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये फक्त 28 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 1176 धावा केल्या. 156 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याने 48 विकेट्सदेखील घेतले.
संघासाठी मोठे योगदान
वनडे क्रिकेटमध्ये आफ्रिदीचे पाकिस्तानच्या संघासाठी मोठे योगदान असले तरी कसोटी क्रिकेटमध्ये तो फक्त 27 सामने खेळू शकला. कसोटीमध्ये आफ्रिदीच्या नावावर 1176 धावा आणि 48 विकेट्स जमा आहेत. आफ्रिदीची कसोटीमध्ये 156 धावांची सर्वाधिक वैयक्तिक खेळी आहे. वनडेमधील करिअर पाहाता आफ्रिदीने पाकिस्तानसाठी आजवर तब्बल 398 वनडे सामने खेळले असून 8064 धावा ठोकल्या आहेत. यात 124 धावांची वैयक्तिक खेळी आणि 395 विकेट्स त्याच्या खात्यात जमा आहेत. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये आफ्रिदीने 98 सामने खेळले आहेत. ट्वेन्टी-20 मध्ये आफ्रिदीने 97 विकेट्स घेतल्या असून 1405 धावा केल्या आहेत.