नवी दिल्ली । नुकत्याच झालेल्या सिंगापूर खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या क्रमवारीत दोन स्थानांनी आगेकूच करीत तिसर्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या आठवडयात सिंधूची पाचव्या स्थानावर घसरण झाली होती. दोन आठवडयांपूर्वी 21 वर्षीय सिंधूने कारकीर्दीतील सर्वोत्तम अशी भरारी घेताना दुसरे स्थान प्राप्त केले होते.
जयराम 13 व्या स्थानी
लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालनेही एका स्थानाने आगेकूच करताना आठवा क्रमांक गाठला आहे. पुरुष एकेरीत सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील उपविजेता किदम्बी श्रीकांत आणि विजेता बी. साईप्रणीत या दोघांनीही प्रत्येकी आठ स्थानांनी आगेकूच करीत अनुक्रमे 21व्या आणि 22व्या स्थानावर मजल मारली आहे. प्रणीतला नुकत्याच झालेल्या सिंगापूर ओपनचा चांगलाच फायदा झाला आहे. अजय जयराम हा या क्रमवारीतील भारताचा अग्रेसर खेळाडू असून, तो 13व्या स्थानावर आहे. क्रमवारीपेक्षा मी कामगिरीवर जास्त लक्ष देते, पण कामगिरीत मी सातत्य ठेवू शकले तर एक दिवस नक्कीच नंबर एकची खेळाडू होईन, असा आत्मविश्वास सिंधूने व्यक्त केला. सिंधू म्हणाली की, पराभव हा वाट्याला येतच असतो. तुम्ही अनेकदा जिंकता आणि तितकेच वेळा पराभूत देखील होता. प्रत्येकवेळी तुम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच क्रमवारीत सुधारणा होते. त्यामुळे मी क्रमवारी सुधारण्यावर नाही, तर कामगिरीवर जास्त लक्ष देते.