मुंबई । आयडीबीआय फेडरल लाइफ इन्श्युरन्स क्वेस्ट फॉर एक्सलेन्स आणि पुल्लेला गोपीचंद अकॅडमीतर्फे देशाला उदयोन्मुख बॅडमिंटनपटू मिळवून देण्याकरिता यंग चँम्प्स उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे 10 वर्षांपर्यंत आणि त्या खालील वयोगटातील युवा प्रतिभावंताना बॅडमिंटन कौशल्य 2 मिनिटांच्या व्हिडिओमधून दाखविण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेच्या विजेत्यांना निवड प्रक्रियेतून गेल्यानंतर हैदराबाद येथील पुल्लेला गोपीचंद अकॅडमीमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
प्रवेशासाठी इच्छुक मुलांच्या पालकांना क्वेस्ट फॉर एक्सलेन्स या फेसबुक आणि ट्विटर पेजचा वापर करून प्रवेश नोंदवता येतील. त्याकरिता अर्जदारांनी स्वच्छ सूर्यप्रकाशात आणि स्पष्ट दिसणारा दोन मिनिटांचा व्हिडिओ काढून शेअर करायचा आहे. या उपक्रमासाठी प्रवेश मोफत असून आगामी तीन आठवड्यांच्या कालावधीत प्रवेश अर्ज स्वीकारले जातील, त्याकरिता चार ते सहा आठवड्यांची प्रदीर्घ निवड प्रक्रिया चालेल. विजेत्यांची निवड स्वत: पुल्लेला गोपीचंद यांच्याकडून करण्यात येईल आणि निवड झालेल्यांची क्वेस्ट फॉर एक्सलेन्स फेसबुक आणि ट्वीटर पेजवरून घोषणा होईल.