बॅडमिंटन स्पर्धेत विघ्नेश देवळेकरचा डबल धमाका

0

मुंबई । अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या विघ्नेश देवळेकरने दुहेरी विजय मिळविला आहे. कलकत्ता येथे झालेल्या पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी या गटात विघ्नेशने सुवर्णपदक पटाकवत नवा विक्रम प्रस्थापित केला.ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेंतर्गत 20 वर्षीय विघ्नेशने आक्रमक दर्जेदार खेळामुळे अल्पावधीत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला.

सुपर सिरीजमध्ये विजेतेपदासाठी कसून सराव
स्पर्धेत विघ्नेश-सौरभ शर्मा जोडीला दुसरे मानांकन देण्यात आले. अंतिम सामन्यात विघ्नेश-सौरभ जोडीचा सामना अनुभवी चेतन आनंद-डीजू जोडीशी झाला. पहिल्या सेटमध्ये विघ्नेश-सौरभ जोडीने 21-15 असा विजय मिळवत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या सेटमध्ये चेतन-डीजू जोडीने कडवी झुंज दिली. मात्र कोर्टावर उत्तम पदलालित्य , आक्रमक आणि बचावात्मक फटक्यांचा प्रभावी वापर करत विघ्नेश-सौरभ जोडीने 27-25 असा विजय मिळवत. तत्पुर्वी, उपांत्य फेरीत विघ्नेश-सौरभ जोडीने अव्वल मानांकित अरुण जॉर्ज-शिवम शर्मा या जोडीचा 21-15, 21-12 असा धुव्वा उडवत धक्कादायक विजयाची नोंद केली.मिश्र दुहेरी गटात विजयासाठी विघ्नेश- व्ही.हरिका जोडीला सौरभ शर्मा-अनुष्का पारेख जोडीने कडवी झुंज दिली. 1-1 अशा बरोबरीनंतर निर्णायक सेटमध्ये विघ्नेश-हरिकाने कोणताही दबाव न घेता नैसर्गिक खेळावर भर दिला. अखेर निर्णायक सेटमध्ये 21-9 असे शानदार वर्चस्व राखत सुवर्ण पदाकाला गवसणी घातली. उपांत्य फेरीत विघ्नेश-हरिका जोडीने रेल्वेच्या अर्जुनकुमार रेड्डी- धन्या नायर जोडीचा 22-20, 10-21, 21-15 असा पराभव केला. आगामी उत्तरप्रदेश मधील बरेली येथील राष्ट्रीय स्पर्धा आणि दिल्लीतील सुपर सिरीजमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी विघ्नेश कसून सराव करत आहे.