‘बॅण्डिट क्वीन’ प्रदर्शित होऊ शकतो, ‘पद्मावत’ का नाही?

0

बंदी घालणार्‍या चारही राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली : ‘पद्मावत’ सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे बंदीचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या संजय लीला भन्साळी यांना मोठा दिलासा मिळाला. जेव्हा बॅण्डिट क्वीन हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होऊ शकतो, तर पद्मावत का नाही? असा खडा सवाल करत, या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी राजस्थान, हरियाना, मध्यप्रदेश व गुजरात राज्यांनी घातलेली बंदीही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी उठविण्याचे आदेश दिले. सिनेमांच्या प्रदर्शनासाठी संसदेने सेन्सॉर बोर्डाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. आणि, बोर्डानेही या सिनेमाला प्रमाणपत्र दिले आहे तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करत राज्ये या सिनेमावर बंदी कशी काय घालू शकतात? अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी संबंधित राज्यांना फटकारले. दीपिका पदुकोन, शाहीद कपूर, आणि रणवीर सिंह यांनी अभिनित केलेला पद्मावत हा सिनेमा आता 25 जानेवारीपासून संपूर्ण देशात एकाचवेळी प्रदर्शित होणार आहे.

ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिश साळवेंनी मांडली निर्मात्यांची बाजू
पद्मावत सिनेमात राणी पद्मावती यांची प्रतिमा मलिन करण्यात आल्याच्या आरोपावरून करणी सेनेसह विविध संघटनांनी या सिनेमाला विरोध केला होता. त्यातच भाजपची सत्ता असलेल्या मध्यप्रदेश, हरियाना, राजस्थान आणि गुजरात राज्यांमधील सरकारने अधिसूचना काढून या सिनेमावर आपल्या राज्यांत बंदी घातली होती. त्याविरोधात निर्माते संजय लीला भन्साळी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिश साळवे यांनी निर्मात्यांची बाजू मांडली. सेन्सॉर बोर्डाने देशभर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी प्रमाणपत्र दिले आहे. अशावेळी राज्यांनी घातलेली बंदी असंवैधानिक असून, ही बंदी उठविली पाहिजे, अशी मागणी अ‍ॅड. साळवे यांनी केली. त्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम राज्यांचे आहे. ते राज्यांचे संवैधानिक कर्तव्यच आहे, असे सांगत या राज्यांनी चित्रपटाबाबत काढलेली अधिसूचना चुकीचे असल्याचे निरीक्षणही सरन्यायाधीशांनी नोंदविले.

देशात हिंसाचार उफळेल : करणी सेनेचा इशारा
पद्मावत सिनेमावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली असली तरी, आमचा विरोध कायम राहणार आहे. तसेच, पद्मावत बॉक्स ऑफिसवर झळकला तर देशात हिंसाचार होईल, असा इशारा करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह यांनी दिला आहे. तसेच, आम्ही कायद्याला घाबरत नाही, असेही ते म्हणाले. खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना अजय सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपणास मान्य नसल्याचे सांगितले. ख्रिश्‍चन, मुसलमानांनी आक्षेप घेतल्यानंतर तात्काळ चित्रपटावर बंदी येते; मात्र हिंदू समाजावर अन्याय केला जातो. हिंदूंच्या भावनांची कदर केली जात नाही, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो. या सिनेमाविरोधात आम्ही 25 जानेवारीरोजी जेलभरो आंदोलन करणार आहोत; गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमावरही आम्ही बहिष्कार टाकणार आहोत, असेही अजय सिंह यांनी सांगितले. मोदी यांना हिंदुत्वासाठी आम्ही मते दिली होती. त्यामुळे पुढल्यावेळी हिंदूंची मते मागायला येऊ नका. तुम्हाला ही मते मिळणार नाही, असेही सिंह यांनी मोदींना ठणकावून सांगितले.