नंदुरबार: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा घेणार आहे. त्यांच्या सभेची पूर्वतयारी म्हणून आज नंदुरबारमध्ये युतीचे नेते, पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती. मात्र युतीच्या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा फोटो नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. सुरु असलेल्या बैठकीतून नेते निघून गेल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला.
नंदुरबार लोकसभा मतदार संघात युती धर्म पाळला जात नसल्याचा आरोप सेनेचे पदाधिकारी करत आहेत. नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीत भाजपा सेना युतीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशा पाडवी, युवती सेनेच्या मालती वळवी, मुबंईच्या शालिनी देशपांडे, तालुका प्रमुख रमेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर लावण्यात आलेल्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उमेदवार खासदार हिना गावीत यांचेच फोटो होते. सेनेच्या नेत्यांना स्थान देण्यात आले नसल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.