बॅनर फाडल्याने कानळद्यात तणाव!

0

जळगाव। तालुक्यातील कानळदा येथे मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी राष्ट्रपुरूषाच्या बॅनरवर दगडफेक करुन बॅनर फाडल्याने बुधवारी सकाळी तणाव निर्माण झाला होता. सकाळी साडे सहा वाजता हा प्रकार लक्षात आल्यानंतर समाजबांधवांनी मुख्य चौकात एकत्र येऊन ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. यावेळी भोकर व जळगावकडे जाणार्‍या एस.टी.बसेस व अन्य वाहने दोन तास रोखून धरण्यात आली होती. तर गावात येत असलेल्या एका बसवर दगडफेक करून काचाही फोडल्या. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयीताना ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन अधिकार्‍यांना आणि ग्रामस्थांना सूचना करून शांततेचे आवाहन केले.

दोन संशयीत ताब्यात…
होर्डिंग फाडल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी बुधवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारात मयुर सोपान सपकाळे आणि मयुर बापू सपकाळे यांना ताब्यात घेतले. तर तिसरा संशयीत फरार असून त्यालाही लवकरात लवकर अटक करणार असल्याची माहिती सांगळे यांनी दिली. या प्रकरणी सिद्धार्थ भोजू सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरूणाच्या लक्षात आला प्रकार
कानळदा गावातील जळगाव तालुका कापूस उत्पादक सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीवर मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास गावातील काही काही तरूणांनी जयंतीउत्सवाचे होर्डिंग लावले. रात्री 12 वाजेपर्यंत तरूण त्याच ठिकाणी बसलेले होते. त्यानंतर घरी गेले. सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास बॅनर फाडल्याचे प्रकार एका तरुणाच्या लक्षात आला. त्याने समाजबांधवांना याची माहिती दिल्याने अवघ्या दहा मिनिटात शेकडो समाजबांधव चौकात जमले. बॅनर फाडण्यार्‍यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन ठिय्या मांडला. यावेळी काही जणांनी दगडफेकही केली. यात एका जणाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी गावात प्रवेश करणार्‍या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.

शांतता समितीच्या बैठक ग्रामस्थांचा संताप..
सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी कानळदा येथे जाऊन घटनास्थळाची पहाणी केली. त्यानंतर लागलीच ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी नांद्रा येथील जयराम पांडुरंग सोनवणे यांनी वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांना माहिती देऊनही ते लवकर पोहोचले नाहीत. तसेच पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनाही माहिती दिल्यानंतर दोन तासांनी ते गावात आल्याचा आरोप केला. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर काहींनी बुधवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्याची मागणी केली. मात्र सांगळे यांनी ती मान्य केली नाही. उलट ग्रामस्थांनीच आठवडे बाजाराला संरक्षण दिले पाहिजे. सांगून संतप्त ग्रामस्थांची समजूत काढली. तसेच मुकूंद सपकाळे यांनीही संतप्त ग्रामस्थांना शांत केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी 13 आणि 14 एप्रिल रोजी गावात दारूबंदीची मागणी केली. त्यावर सपकाळे यांनी सांगितले की, जो व्यक्ती मिरवणूकीत दारू पिऊन धिंगाणा घालेल. त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तसेच या घटने विषयी सोशल मिडीयावर पोस्ट टाकू नये असेही सांगळे यांनी यावेळी सांगितले.

रस्ता आडवून बसवर दगडफेक
कानळदा गावात प्रवेश करणार्‍या रस्त्यावर संतप्त ग्रामस्थांनी सकाळी 8.30 ते 9.30 वाजेपर्यंत ठिय्या केला. त्यानंतर रस्त्यावर बैलगाडे आडवे लावून रस्ता आडवला. काही वेळानंतर आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. त्यामुळे बसच्या काचा फुटल्या आहेत. त्यानंतर 10 वाजेच्या सुमारास तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी पथकासह गावात पोहोचले. संतप्त ग्रामस्थांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. तसेच होर्डिंग फाडणार्‍यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. शिंपी यांनी रस्त्यावरील बैलगाडे बाजुला करून रस्ता मोकळा करण्यास सांगितले.