बेंडभरपाटील यांना युवा साहित्यिक पुरस्कार

0

सणसवाडी । अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरूरच्या वतीने यंदाचा उत्कृष्ट युवा साहित्यिक पुरस्कार तालुक्यातील प्रसिद्ध कवी, लेखक व उपक्रमशील शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभरपाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते शिक्रापूर येथे बुधवारी (दि.29) 10 वाजता प्रदान करण्यात येणार आहे.

सचिन बेंडभर हे हवेली तालुक्यातील वढु खुर्द येथे कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत त्यांनी बालसाहित्यात 15 पुस्तके, कथा संग्रह 8, काव्यसंग्रह 3, कादंबरी 3, अनुवाद 6 पुस्तके लिहिली आहेत. या शिवाय उत्तर या लघुपटाचे कथा व संवाद त्यांनी लिहिले आहेत. यात रानवारा व गाणं शिवराचं हा काव्य संग्रह विशेष प्रसिद्ध आहे. तर त्यांचा नानाची टांग कथासंग्रह राज्यभर गाजला आहे. त्यांनी शाळेतील मुलांसाठी कथा कवितांचे मनातल्या कविता, शिंपल्यातले मोती ही दोन पुस्तके संपादीत केली आहेत. तर ’कळों निसर्ग मानवा’ ही कविता इंग्रजी, उर्दू, कन्नड माध्यम शाळेतील सहावीच्या पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे. त्यांना ज्ञानप्रेरणा, युवा साहीत्यिक समाज गौरव, उत्कृष्ट युवा कथालेखक, ग्रामीण साहित्यिक असे एकूण 7 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या कौशल्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.