जळगाव । बुधवारी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील महात्मा फुले अध्यासन केंद्राद्वारे “जागतिकीकरणात समाजसुधारकांच्या विचारांची समर्पकता“ या विषयावरील दोन दिवशीय चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून पन्नालाल सुराणा, इतिहास साऊथ एशिएन इन्स्टीट्युट, हैडेलबर्ग विद्यापीठ, जर्मनी विभाग प्रमुख डॉ. गीता धरमपाल – फ्रिक् ,अध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी , सचिव प्रा. एन. एस. पाटील , डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय प्राचार्य डॉ. एस. एस. राणे , डॉ. एस. एस. मायी. उपस्थित होते. यात जर्मनी, येमेन, सिरिया, केनिया, जर्मनी, अमेरिका येथील संशोधकांनी सहभाग घेतला होता.
भारतीय समाज सुधारणेचा इतिहास मांडला
उद्घाटनप्रसंगी पन्नालाल सुराणा यांनी भारतीय समाज सुधारणेचा इतिहास उपस्थितांपुढे मांडला. त्यांनी बौद्धधर्मामध्ये असलेली समाजसुधारणेची परंपरा विशद करत बुद्धाने दिलेल्या ‘अत: दिप भव‘ चा मंत्र व बुध्द तत्वज्ञानातील वैज्ञानिकता विशद केली. वैदिक धर्म पध्दतींमधील कर्मकांडांविषयक व अंधश्रध्दामूलक गोष्टींबाबत आपले सडेतोड मत मांडले. डॉ. गीता धरमपाल – फ्रिक् यांनी जागतिक स्तरावरील सुधारणावादी चळवळींबाबत विवेचन करून महात्मा गांधीचे या चळवळीतील महत्व स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. सुभाष चौधरी यांनी जागतिकीकरणात समाजसुधारकांच्या विचारांची अधिक आवश्यकता आहे असे मत मांडले. प्राचार्य डॉ. एस. एस. राणे यांनी स्वागत तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. आभार डॉ. एस. एस. मायी यांनी मानले.