बेंन्टेक्स दागिणे खरेदी करताना सोन्याचे खरे मंगळसूत्र चोरले : भुसावळात दोघा महिलांना अटक

भुसावळ : बेंटेक्स ज्वेलरी खरेदी करीत असलेल्या भुसावळ पोलिस दलातील पोलिसाच्या पत्नीचे दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेवून मंगळसूत्र लांबवल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजता घडली होती. पोलिसांनी तपासचक्रे फिरवताच जालना जिल्ह्यातील महिला जाळ्यात अडकल्या. या महिलांच्या ताब्यातून दोन मंगळसूत्रासह सोन्याचे सहा मणी जप्त करण्यात आले. या महिलांच्या अटकेने आणखी काही चोर्‍या उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. शारदा धनराज चव्हाण (30) व रेखा अफसर चव्हाण (62, दोन्ही रा.वझीदखेडा, पिंपळगाव कोलते, जि.जालना) अशी अटकेतील महिला आरोपींची नावे आहेत.

गर्दीचा फायदा घेत लांबवले मंगळसूत्र
तक्रारदार उषा श्रीकृष्ण चाटे (पोलिस वसाहत, भुसावळ) यांचे पती भुसावळ शहर वाहतूक शाखेत कर्तव्यावर आहेत. मंगळवारी चाटे या महिलांसह मातृभूमी चौकातील गणपती पाहण्यासाठी आल्यानंतर बेन्टेक्स दागिणे पाहत असताना दोन महिलांनी वाढत्या गर्दीचा फायदा घत त्यांचे दोन मंगळसूत्र व सहा सोन्याचे मणी लांबवले. याबाबतची माहिती चाटे यांनी बाजारपेठ पोलिसांना कळवलीव व गुन्हादेखील दाखल केला. पोलिसांनी काही तासातच खबर्‍यांच्या माध्यमातील माहितीद्वारे शारदा चव्हाण व रेखा चव्हाण यांना ताब्यात घेतले. महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 17 हजार 500 रुपयांचे चोरलेले दागिणे जप्त करण्यात आले तर आणखी काही चोर्‍या उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शाखाली हवालदार विजय नेरकर, प्रशांत परदेशी, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, योगेश माळी, परेश बिर्‍हाडे, जावेद शहा, सचिन चौधरी, मीना कोळी, ललिता बारी आदींच्या पथकाने केली. तपास पोलिस नाईक शशीकांत तायडे करीत आहेत.