बेकायदा गणेश मंडपांवर कारवाई कधी होणार

0

पुणे । गणेशोत्सव काळात बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या मंडपांवर कडक कारवाई करणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र उत्सव संपला तरीही अद्याप प्रशासनाने एकाही मंडळावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेले मंडप धोरण फक्त कागदावर असल्याचे दिसत आहे.

मंडपासाठी महापालिका आणि पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एक खिडकी योजनाही सुरू केली होती. मंडळांना आवश्यक त्या परवानग्या वेळेत दिल्या जातील, असे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र शहर आणि उपनगरांमधील काही गणेश मंडळांनी परवानगी न घेताच मंडप उभारल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंडप व जाहिरातींसाठी कमानी उभारल्या जातात. त्यासाठी थेट रस्त्यांवर खड्डे घेतले जातात. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या रस्त्यांची अक्षरश चाळण होते. हे प्रकार रोखण्यासाठी खड्डे विरहीत मंडप उभारण्याची संकल्पना आणण्यात आली. मात्र असे असतानाही अनेक मंडळाकडून रस्त्यांवरच खड्डे घेतले गेले. त्यास लगाम घालण्यासाठी पालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी मंडप धोरण तयार केले.

त्यात रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी खड्डे घेतल्यास प्रत्येक खड्यासाठी दोन हजार रुपये दंडाची तर सलग दोन वर्षे खड्डे घेतल्यास संबधित मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद करण्यात आली. मात्र एकाही मंडळावर कारवाई केलेली नाही. संबंधित अधिकार्‍याकडे विचारणा केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.