बेकायदा गौणखनिज उत्खननप्रकरणी 98 लाखांचा दंड

0

खेडच्या प्रांताधिकार्‍यांनी दिले आदेश

चाकण : कुरुळी (ता. खेड) येथील गट क्रमांक 674 मध्ये गौण खनिजाचे अनधिकृतपणे उत्खनन केल्याप्रकरणी खेडचे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी संबंधितांना 98 लाख 67 हजार रुपयांचा दंड केला आहे. याबाबतचे आदेश त्यांनी नुकतेच पारीत केले आहेत. कुरुळी येथील गट क्रमांक 674 या जमीन मिळकतीमध्ये संबंधितांनी विनापरवाना दोन हजार 530 ब्रास इतके गौणखनिज उत्खनन केलेले आहे. विनापरवाना केलेल्या उत्खननाबाबत रॉयल्टी व पाचपट दंडासह 98 लाख 67 हजार रुपये वसुलीस पात्र असल्याचे प्रांताधिकार्‍यांनी आदेशात म्हटले आहे. सदरची रक्कम खेड तहसीलदार यांच्याकडे 15 दिवसांच्या मुदतीत भरून, त्याचे चलन सादर करावे. दंडाच्या रकमेचा भरणा मुदतीत न केल्यास नियमानुसार तहसीलदारांनी जमीन महसुलाची थकबाकी वसुली बाबतच्या विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असेही आदेशात नमूद केले आहे.

उत्खननासाठी परवानगी घेतली
या उत्खनन प्रकरणी विकास वसंत नाणेकर यांनी महसूल विभागाकडे लेखी म्हणणे सादर केले होते. त्यानुसार संबंधित उत्खननास परवानगी घेतलेली होती. ब्रास, मुरूम या गौणखनिजाची रॉयल्टीही भरलेली आहे. सदरच्या जमीन मिळकतीमध्ये 1 हजार 500 ब्रास मुरूम या गौणखनिजाची रॉयल्टी भरल्यानंतर पुढील उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाकडे रितसर अर्ज केलेला होता. तत्पूर्वीच कारवाई करण्यात आली. सुरुवातीच्या स्थळपाहणी दरम्यान केलेली मोजमापे नाणेकर यांनी अमान्य केली होती. त्यानंतर या उत्खनन प्रकरणामध्ये ईटीएस मशीनद्वारे मोजणी करण्यात आली. मात्र त्यातही अनियमितता असल्याचा आरोप करीत सदरचा निर्णय मान्य नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अपिल दाखल करणार असल्याचे विकास नाणेकर यांनी सांगितले.

प्रकरणाची तालुकाभर चर्चा
दरम्यान या उत्खनन प्रकरणात सुरुवातीला यातील तक्रारदार माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्याशी संबंधित काहींनी लाखो रुपयांची मागणी केल्याचे आरोप विकास नाणेकर यांनी प्रांताधिकार्‍यांसह, महसूल विभागाच्या वरिष्ठांकडे आणि पोलीस प्रशासनाकडे धक्कादायक पुराव्यांसह केले होते. त्यामुळे या प्रकरणाची तालुकाभर चर्चा होती.