बेकायदा पर्ससीन मच्छीमारीविरोधात मच्छीमार कृती समितीचे आंदोलन

0

रत्नागिरी । राज्य तसेच केंद्र शासनाची परवानगी नसताना मत्स्य व्यवसाय खात्याच्या अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात बेकायदा पर्ससीन मासेमारी सुरु झाली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अखिल भारतीय मच्छीमार कृती समितीने 27 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वा. आठवडा बाजार येथून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी कायदा 1981 मधील नियमानुसार राज्याच्या सागरी हद्दीत 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत पर्ससीन मासेमारी परवाना नसलेल्या नौकांना जिल्ह्यात साडेबारा वाव खोल मासेमारी करण्याची परवानगी आहे. परंतु ही मर्यादा ओलांडून मासेमारी केली जाते. पर्ससीन मासेमारी परवाना प्राप्त 274 नौका आहेत. परंतु 150 पर्ससीन व 200 मिनी पर्ससीन अशा 350 मासेमारी परवाना नसलेल्या पर्ससीन नौका आहेत. या नौकांमधून मत्स्य खात्याच्या अधिकार्यांच्या पाठिंब्याने बेकायदा मासेमारी होत आहे.